अख्खे गाव शोधतेय हिरे ! | पुढारी

अख्खे गाव शोधतेय हिरे !

जोहान्सबर्ग ः काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतील एक गाव सोने शोधण्यासाठी खोदकाम करीत असल्याचे वृत्त आले होते. आता दक्षिण आफ्रिकेतील क्लाजुलू नताल प्रांतातूनही असेच एक चित्र समोर आले आहे. या गावातील हजारो लोक गेल्या दोन दिवसांपासून हिरे शोधण्यासाठी खोदकाम करीत आहेत. 

या गावातील एका व्यक्‍तीला खोदकामात हिर्‍यासारखे दिसणारे खडे सापडले. ही खबर वार्‍यासारखी पसरली आणि अख्खे गाव कुदळ, फावडे घेऊन माळरानावर धावले. तिथे या सर्वांनी खोदकाम सुरू केले. काही लोकांना हिर्‍यासारखे दिसणारे दगडही मिळाले; पण अर्थातच हे हिरे नव्हते. वाळूत स्फटिकांसारख्या गारगोट्या असतात तसाच हा प्रकार होता. तज्ज्ञांनी हे ‘क्‍वार्ट्ज क्रिस्टल’ असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही तेथील ग्रामस्थांना हे हिरेच असल्याचे वाटते. या हिर्‍यांमुळे गावाचे नशीब पालटेल याचा त्यांना विश्‍वास आहे. अनेकांनी हे दगड 300 रँड म्हणजेच सुमारे 1500 रुपयांना विकणेही सुरू केले आहे. दरम्यान, स्थानिक सरकारने लोकांना तेथून हटवण्यासाठी व परिसराची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी टीम पाठवली आहे.

Back to top button