आजीबाईंकडे 11 वाहने चालवण्याचा परवाना! | पुढारी

आजीबाईंकडे 11 वाहने चालवण्याचा परवाना!

तिरुवनंतपूरम : एखाद्या आजीबाई साधी कार चालवत असताना दिसल्या, तरी आपल्याला ते विशेष वाटू शकते. उतारवयात अनेक लोकांना ड्रायव्हिंग करणे शक्य होत नसल्याने अर्थातच असे करणारे लोक आपल्या कौतुकाचे पात्र होतात. मात्र, 71 वर्षांच्या एखाद्या आजीबाई रोड रोलरपासून ट्रॅक्टरपर्यंत अनेक वाहने चालवतात आणि त्यासाठीचे परवानेही त्यांच्याकडे आहेत, असे म्हटल्यावर आपल्या भुवया उंचावू शकतील.

अशा आजीबाई केरळमध्ये असून त्यांचे नाव आहे राधामणी. या आजीबाई केवळ स्वतः विविध वाहने चालवतात असे नव्हे, तर त्या इतरांनाही त्याचे प्रशिक्षण देतात. त्यांचे कोचीमध्ये ड्रायव्हिंग स्कूल आहे.

कोचीमधील थोपूमपाडी येथे राहणार्‍या जे. राधामणींना लोक प्रेमाने ‘मनियम्मा’ म्हणतात. जड वाहनाचा परवाना मिळवणार्‍या त्या केरळमधील पहिल्या महिला आहेत. त्या अवघ्या 17 वर्षांच्या होत्या त्यावेळी लग्न करून कोचीतील थोपूमपाडी येथे आपल्या पतीसमवेत आल्या. त्यावेळी त्या दहावीही शिकल्या नव्हत्या.

लग्न झाल्यावर त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना सायकलही चालवता येत नव्हती. त्या काळीमहिलांनी सायकल चालवणे लोकांच्या टीकेचे धनी बनवणारेच होते. मात्र, पतीच्या साथीने त्या कार चालवण्यास शिकल्या. हळूहळू त्या अन्य वाहनेही चालवणे शिकू लागल्या.

1970 च्या दशकात थप्पुमपाडी येथे एझेड ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले. त्या रोड रोलर, ट्रॅक्टर, ट्रेलर कंटेनर, लॉरी, बस, क्रेन, फोर्क लिफ्ट, जेसीबी वगैरे जड वाहने चालवू शकतात. 2004 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले; पण आजही त्या समर्थपणे आपले ड्रायव्हिंग स्कूल चालवत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button