बेळगाव : हॉटेल मॅरिएटमधून हिरेजडित बांगड्यांची चोरी | पुढारी

बेळगाव : हॉटेल मॅरिएटमधून हिरेजडित बांगड्यांची चोरी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
काकती येथील फेअरफिल्ड मॅरिएट हॉटेलमधून आपल्या 10 लाखांच्या हिरेजडित बांगड्या चोरीला गेल्याची फिर्याद एका साखर कारखान्याच्या महिला अधिकार्‍याने काकती पोलिसांत दिली आहे. आपण आरक्षित केलेली खोली दुसर्‍याला उघडून दिल्याचा आरोपही त्यांनी फिर्यादीत केला आहे. नामांकित हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शुक्रवारी काकती पोलिसांनी एका तरुण-तरुणीसह व्यवस्थापन कर्मचार्‍यांची चौकशी केली.

ओलम अ‍ॅग्रो इंडिया, गुरगाव-हरियाणा या कंपनीचा राजगोळी येथे ओलम शुगर नावाने कारखाना आहे. कंपनीच्या एचआर प्रमुख शिप्रा बिजावत 10 मार्चरोजी कारखान्याला भेट देण्यासाठी बेळगावला आल्या होत्या. 15 मार्च रोजी सकाळी 10 वा. त्यांनी हॉटेल मॅरिएटमध्ये 219 क्रमांकाची खोली आरक्षित केली होती. सकाळी त्या राजगोळी खुर्दला रवाना झाल्या. रात्री 10.30 वा. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांच्या खोलीत कोणीतही येऊन गेल्याचे लक्षात आले. बाथरूम, वॉश बेसीन व ओला टॉवेल यामुळे त्यांनी आपल्या रूममध्ये कोणीतरी आले होते, अशी तक्रार व्यवस्थापनाकडे केली.

आधी न मानणार्‍या व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये एक तरुण व एक तरुणी जात असल्याचे दिसून आले. गुरुवारी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा एका कर्मचार्‍याने 219 क्रमांकाची आरक्षित खोली तीन तासांसाठी अन्य दोघांना दिल्याचे समोर आले. त्यामुळे बिजावत यांनी काकती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आपल्या खोलीतील पर्समधून 10 लाख रु. किमतीच्या हिरेजडीत बांगड्या चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केलेच, शिवाय आपली रूम इतरांना देऊन गोपनियतेचा भंग केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

त्या दोघांची चौकशी

पोलिसांच्या म्हणण्यानुसार शिप्रा यांना 219 क्रमांकाची खोली दिली होती, तर त्याच्या बाजूची 220 क्रमांकाची रूम दुसर्‍या दोघांना दिली होती. परंतु, हे दोघेजण 220 ऐवजी 219 जवळ थांबून स्मार्ट चावी स्वाईप करत होते. पण, दरवाजा उघडत नव्हता. त्यावर रूमबॉयने मास्टर कीद्वारे ही खोली उघडून दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. पोलिस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. तपास करीत आहेत.

Back to top button