सातारा : रासायनिक खतांचे दर भडकणार | पुढारी

सातारा : रासायनिक खतांचे दर भडकणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा
रशिया-युक्रेन युद्धाचा दुष्परिणाम हळूहळू भारतात दिसू लागला आहे. मागील काही दिवसांत तेलाच्या दरात वाढ झाली असताना आता इंधन व खतांच्या दरात वाढ झाल्याने कृषी क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. युद्धामुळे पोटॅश आणि फॉस्फरसच्या आयातीत अडथळे येत असल्याने या खतांचे दर आणखी वाढण्याची भीती आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. भारत 12 ते 15 टक्के खते रशिया, युक्रेन आणि बेलारूस येथून मागवतो. त्यामुळे याचा थेट परिणाम आता शेतकर्‍यांवर दिसू लागला आहे. खत निर्मितीत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. युक्रेन अणि बेलारूसमधून पोटॅशची निर्यात केली जाते. खतांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा न झाल्याने व युद्धही न थांबल्याने दराचा भडका उडणार आहे.

युद्धामुळे रशिया आणि बेलारूसवर लावलेल्या निर्बंधांमुळे पुढील काळात पुरवठ्यामधील अडथळे वाढण्याची शक्यता आहे. तसेच रशियातून येणार्‍या कच्च्या मालाचे आयातमूल्य वाढल्याने त्याचा परिणाम किमतीवर होणार आहे. त्यामुळे सरासरी 400 ते 500 रुपये खतांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. खतांवरील अनुदान बंद झाल्याने याचा फटकाही आता शेतकर्‍यांना बसणार आहे. त्यामुळे युद्धाचा फटका बसून कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 35 हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्‍लक आहे. यामुळे आता खत दुकानदारांकडून जादा दराने खत विक्री होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कृषी दुकानांची तपासणी करा

रशिया-युक्रेन युद्धामुळे रासायनिक खतांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाची आवक घटली असून त्यामुळे या खतांच्या किमतीत वाढ होणार आहे. अर्थातच यामुळे सेंद्रिय खते तसेच शेणखतालाही चांगलेच महत्त्व येणार आहे. असे असले तरी शेणखताचे भाव अगोदरच चढे असल्याने शेतकरी पुरता कोलमडला जाणार आहे. ज्या खतांच्या किमतीत वाढ होणार आहे त्या खतांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री होऊ नये यासाठी कृषी अधिकार्‍यांनी भरारी पथके तयार ठेवली पाहिजेत.

Back to top button