लवीव विमानतळावर रशियन फौजांचा हल्ला | पुढारी

लवीव विमानतळावर रशियन फौजांचा हल्ला

मॉस्को/कीव्ह : वृत्तसंस्था

रशिया-युक्रेन युद्धाच्या 23 व्या दिवशी रशियन फौजांनी आता सुरक्षित समजल्या जाणार्‍या पश्चिम युक्रेनमधील विविध प्रांतावरही हल्लाबोल केला आहे. लवीव विमानतळावर रशियन फौजांनी हल्ला केला. या हल्ल्यात विमानतळाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे; पण विमानतळ सुरक्षित आहे, अशी माहिती लवीवच्या महापौरांनी दिली आहे.

दरम्यान, चेर्नेहीव येथे गोळीबारात एका अमेरिकन आणि अनेक युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना ठग, हत्यारा आणि हुकूमशहा असे संबोधले आहे. कॅपिटल हिलमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

संयुक्त राष्ट्राची बैठक

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी रशिया-युक्रेन युद्धाबाबत एक आपत्कलानी बैठक आयोजित केली होती. बैठकीत युक्रेन, अमेरिका आणि ब्रिटनच्या प्रतिनिधींनी रशियावर युक्रेनच्या जास्त लोकसंख्या असलेल्या भागातील वैद्यकीय सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. त्यानंतर ही बैठक स्थगित करण्यात आली. रशियन प्रतिनिधींनी मात्र हे आरोप फेटाळताना हा प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे.

युक्रेनची स्थिती चिंताजनक  : भारत

संयुक्त राष्ट्रे :  युक्रेनमधील मानवी हालअपेष्टांना कोणताही पारावार न उरल्यामुळे संयुक्तराष्ट्रांत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी तिरुमूर्ती यांनी सांगितले की, युक्रेनमधून भारताने आपल्या 22500 नागरिकांना सुरक्षितरीत्या मायदेशी आणले आहे. खेरीज अन्य अठरा देशांनाही याकामी भारताने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. तथापि, दिवसेंदिवस युक्रेनमधील मानवविषयक सर्व प्रकारची परिस्थिती दयनीय होत चालली आहे.

मानवतावादालाही शरमेने मान खाली घालावी लागेल असे द़ृश्य युक्रेनमध्ये जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे यातून मार्ग काढताना त्यात कसल्याही स्वरूपाचे राजकारण आणले जाऊ नये. भारताने यासंदर्भातील आपल्या भावना सातत्याने व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मानवतेच्या द़ृष्टिकोनातून भारताने युक्रेनला तब्बल नव्वद टन औषधांचा पुरवठा केल्याचेही तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले.

अर्नोल्डचा युक्रेनला पाठिंबा

हॉलीवूड सुपरस्टार आणि कॅलिफोनिर्याचे गव्हर्नर अर्नोल्ड श्वार्झनेगर यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. रशियन लोकांचा दिलदारपणा माझ्यासाठी नेहमीच प्रेरक ठरला आहे पण युक्रेनसोबत रशिया जे करत आहे ते बेकायदा युद्ध आहे. क्रेमलिनच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्यावर कडक निर्बंध लागू केले आहेत. 10 कोटी रशियन्सचे युक्रेनवासीयांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे रशियन सैनिकांनीच शस्त्रे टाकावीत. युद्ध लढू नये, असे आवाहन त्यांनी केले.

महत्त्वाच्या घडामोडी

  • रशियन हल्ल्यात युक्रेनची अभिनेत्री ओकसाना श्वेट्स यांचा मृत्यू.
  • अमेरिकन सिनेटने रशिया आणि बेलारूससोबत व्यापार संबंध संपुष्टात आणणारे विधेयक मंजूर केले. या विधेयकामुळे रशियन
  • मालावर मोठ्या प्रमाणात कर लावण्याची परवानगी मिळेल.
  • अमेरिका-युक्रेनचे जैविक युद्धासाठी एकमेकांना सहकार्य : रशियाचा दावा
  • अमेरिकेत रशियाकडून युरेनियम आयातीवर बंदीबाबत विधेयक सादर

Back to top button