चिपळूण : उष्णतेच्या लाटेत 22 हजार मेगावॅटची गरज | पुढारी

चिपळूण : उष्णतेच्या लाटेत 22 हजार मेगावॅटची गरज

चिपळूण : समीर जाधव
वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक गरजेवेळी कोयना वीज प्रकल्पातून वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या राज्याला तब्बल 22 हजार मेगावॅटची गरज असून शासनाच्या विविध वीजनिर्मिती प्रकल्पातून 15 हजार 135 मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे, तर उर्वरित सात हजार मेगावॅट खासगी कंपन्यांकडून विकत घेतली जात आहे. अत्यावश्यक वेळीच जलविद्युत प्रकल्पांचा वीजनिर्मितीसाठी वापर होत आहे.

अत्यावश्यक बाब म्हणून पोफळीतील कोयना वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा लागला. चार जनित्रांमधून 1600 मेगावॅटची निर्मिती काही तासांत करण्यात आली. याचा परिणाम म्हणून वाशिष्ठीला मोठ्या प्रमाणात अवजल सोडले गेले.वाढत्या तापमानामुळे राज्यात विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. तब्बल साडेसहा हजार मेगावॅटची गरज निर्माण झाली. त्यासाठी अन्य खासगी विद्युत निर्मिती कंपन्यांकडून ही वीज खरेदी केली जात आहे.

कोयनेत वीजनिर्मितीसाठी अवघे 18 टीएमसी पाणी

महाराष्ट्र-कर्नाटक लवादानुसार कोयना धरणातील वर्षभरात 67 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येत असते. या करारानुसार आत्तापर्यंत 49 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यात आले आहे. आगामी एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी कोयना धरणामध्ये वीजनिर्मितीसाठी अवघे 18 टीएमसी पाणी शिल्लक आहे. हा साठा महाजनकोला पुढचे दोन महिने वापरावा लागणार आहे. एकीकडे विजेची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे पुरवठा मात्र कमी होत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button