औरंगाबाद : बंडखोर आ. बोरनारे ‘लाखाचे’ नव्हे, तर ‘रोषाचे’ धनी

औरंगाबाद : बंडखोर आ. बोरनारे ‘लाखाचे’ नव्हे, तर ‘रोषाचे’ धनी
Published on
Updated on

वैजापूर (विजय गायकवाड) ः पुढारी वृत्तसेवा :  सेनेच्या बंडखोर आमदारांविरुध्द स्थानिक सेना एकवटल्याने सोमवारी शहर दणाणून गेले. आतापर्यंत जे आमदारांच्या सोबत होते. त्या स्वकीयांनीच सपासप शब्द'बाण' मारून अक्षरशः त्यांना 'घायाळ' केले. यावेळी सर्वांनीच त्यांची 'लायकी' व 'औकात' काढली. 'लाखाचे' धनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बोरनारेंना 'रोषाचे' धनी व्हावे लागले. बैठकीत त्यांना 'गद्दार' म्हणून हिणवण्याची एकही संधी नेते व पदाधिकार्‍यांनी संधी सोडली नाही. सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सेना कार्यकर्त्यांची बैठक व निदर्शने करण्यात आल्याने शहरासह तालुक्यात मोठा चर्चेचा विषय ठरला.

सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे तसे बोरनारे गटाचे समजले जात होते. या दोघांतील 'मधूर' संबंध सर्वश्रुत आहे. परंतु परिस्थिती बदल्यावर स्वकीयही विरोधात जातात. हेच यावरून सिद्ध झाले. खैरेंनी या बैठकीत त्यांचे 'गुपित' उघड करून बुरखा टराटरा फाडला. शब्द'बाणांनी' अक्षरशः घायाळ केले. बोरनारेंविरुध्द बोलण्याची संधी कुणीच सोडली नाही. अंबादास दानवेंसह अ‍ॅड. आसाराम रोठे व अविनाश गलांडे यांनीही बोरनारेंची चांगलीच पोलखोल केली. एरवी बहुतांश वेळा 'डरकाळ्या' फोडणार्‍यांनी या बैठकीत बोलतांना मुद्दामहून 'जीभेवर' नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.

बोरनारेंशी असलेले 'जिव्हाळ्याचे' संबंध त्यांच्यासाठी बोलताना अडसर ठरले. परंतु हा 'सावध' पवित्रा उपस्थित नेते व नागरिकांच्या नजरेतून सुटला नाही. असे असले तरी ज्यांना 'उजरून' घ्यायचे त्यांनी बरोबर उजरून घेतले. बोरनारेंनी बंडखोरी केली. हे सत्य असले तरी स्थानिक सेना काही दुभंगली होती. गोतावळ्यातील काही 'नारदामुळे' सेना कार्यकर्त्यांमध्ये अंतर पडत गेले. बोरनारेंनी मोजक्याच कार्यकर्त्यांना जवळ केल्याने बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते दुखावलेले होते. त्यांच्या गोतावळ्यात पदाधिकारी, कार्यकर्ते कमी आणि 'ठेकेदार' कार्यकर्ते जास्त झाल्यामुळे खरे सैनिक बाजूला पडले.

बोरनारेंनी केलेली बंडखोरी आणि पदाधिकार्‍यांना त्यांच्याविरुद्ध मिळालेली बोलण्याची आयती संधी हा केवळ 'दुग्धशर्करा' योग जुळवून आला. असेच म्हणावे लागेल. या सर्व बाबींचा परिपाक म्हणजे सर्वांनीच त्यांना 'गद्दार' म्हणून हिणवत त्यांची 'लायकी' व 'औकात' काढली. यानिमित्ताने 'खदखद' काढण्याची कसर कुणीच सोडली नाही. या बैठकीस ठेकेदार कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले नाही. मात्र ते कानोसा घेत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बोरनारे एक लाख मतांनी निवडून आल्याने त्यांची ओळख लाखाचे धनी अशी झाली. परंतु एकंदरीत सध्याच्या वातावरणावरून ते रोषाचे धनी झाल्याचे चित्र आहे.

असाही योगायोग

शहरालगतच्या ज्या साई लॉनमध्ये माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांनी बोरनारेंना सन 2019 चा विधानसभा उमेदवार म्हणून जाहीर केले होते, त्याच लॉनमध्ये सेनेच्या नेत्यांसह पदाधिकार्‍यांनी त्यांची 'गद्दार' म्हणून अवहेलना केली. हा योगायोग म्हणावा लागेल.

खैरे हे सर्वात मोठे 'बाबा'

एकीकडे बोरनारेंवर भडिमार सुरू असतानाच खैरेंनी अचानक ट्रॅक सोडला. खैरे हे सर्वात मोठे 'बाबा' आहेत. हे जिल्ह्यात सर्वश्रुत आहेच. सेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांना 'जादूटोणा' येत असल्याचा अचानक 'साक्षात्कार' त्यांना यावेळी झाला. त्यांच्या तोंडात सतत पांढरी गोळी असते म्हणे. त्यामुळे सर्व बंडखोर त्यांच्या 'वशीकरणात' असल्याचा अजब शोध खैरेंनी लावला. खैरेंचे हे धार्मिक 'दारिद्य्र' मात्र कुणाच्या पचनी पडले नाही.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news