

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून केडगावला (ता. दौंड) दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. दादा खंडू गरदडे, शिवाजी माणिक वाघमोडे (दोघेही रा. केडगाव) अशी त्यांची नावे आहेत. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर रहिम हुसेन शेख (वय 50, रा. केडगाव) हा स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. सदर घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव स्टेशन परिसरात रेल्वे फलाट क्रमांक दोनच्या उत्तरेला ओढ्यात पिंपळाच्या झाडाखाली गरदडे, वाघमोडे आणि अन्य काही बसले होते. या ठिकाणी येत रहिमने, 'इथे बसायचे आहे, जागा द्या,' असे सांगत वरील दोघांशी वाद घातला. या प्रकारानंतर रहिम तेथून निघून गेला. काही वेळातच पुन्हा परत येत त्याने गरदडे आणि वाघमोडे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात गरदडेच्या मानेवर आणि गालावर जबर जखम झाली. वाघमोडेच्या पाठीवरही वार झाले आहेत.
गरदडे हे केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, वाघमोडेला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर रहिम हा यवत पोलिसांत हजर झाला. याप्रकरणी यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.