पुणे : वृद्ध महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकाला कारावास | पुढारी

पुणे : वृद्ध महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकाला कारावास

पुणे : भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणार्‍या वृद्ध महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विष्णू अर्जून खेडकर (वय 46, रा. चकलंबा, गेवराई, बीड) या टेम्पोचालकास न्यायालयाने एका वर्षाचा साधा कारावास आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. ही घटना 7 जुलै 2013 रोजी पाटील इस्टेट चौकात घडली होती. पार्वती शंकर लोखंडे आपल्या बहिणीसोबत रस्ता ओलांडत असताना सिग्नल सुटल्याने भरधाव आलेल्या टेम्पोने त्यांना
धडक दिली.

नोकराला 21 लाखांच्या मुद्देमालासह अटक 

या अपघातात टेम्पोचे चाक लोखंडे यांच्या पायावरून गेले. लोखंडे यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ज्ञानेश्वर सुनील नेतावते यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
खडकी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. के. गायकवाड यांनी टेम्पोचालकाला अटक करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यात सहायक सरकारी वकील व्ही. आर. बाकल यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. आरोपी कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असून, ते शेतमजुरी करून गुजराण करत आहे. अशी बचाव पक्षाने बाजू मांडली.

Back to top button