हिंगोली: कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारा | पुढारी

हिंगोली: कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारा

सेलू, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातून वाहणार्‍या कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारून वाहून जाणारे पाणी अडविले तर शेकडो हेक्टरशेतजमीन सुपीक होईल. मात्र अनेक वर्षांपासून याबाबत संबंधित विभागाने कुठलेच ठोस पाऊल उचलले नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

सेलू तालुक्यालगतच्या जालना जिल्ह्यातील अंगलगाव परिसरातून कसुरा नदीचा उगम आहे. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव, रवळगाव, कुंडी, ढेंगळी पिंपळगाव, सोन्ना परिसरातून नदी वाहत असून मगर सावंगी येथे दुधना नदीला मिळते. तालुक्यातून जवळपास 33 कि.मी.परिसरातून नदी वाहते. काही ठिकाणी नदीचे पात्र अरुंद असले तरी चांगला पाऊस झाल्यानंतर कसुराला पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. अनेक वेळा कुंडी येथील सेलू ते पाथरी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्प होते.

ढेंगळी पिंपळगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने पाथरी व परभणीकडे जाणारी वाहतूक काहीवेळ बंद पडते. कसुराचे पाणी योग्य वापरासाठी नदीवर किमान तीन मोठे कोल्हापुरी बंधारे उभारून पाणीसाठा केला तर शेतीसह या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. दुधना प्रकल्प पाण्यापासून वंचित गावांना कसुरावर बंधारे उभारून पाणी उपलब्ध केले जाऊ शकते, असे जलतज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी कसुरावर काही ठिकाणी लघु सिंचन व जिल्हापरिषदेकडून छोटे बंधारे बांधले मात्र त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली. दरम्यान, कसुरावर कोल्हापुरी बंधारे चांगल्या उंचीचे उभारून पाणीसाठा वाढविला जाऊ शकतो. कसुराचे दरवर्षी पाणी दुधना मार्गे नांदेड येथील विष्णुपुरीत नंतर दुसर्‍या राज्यात जाणारे पाणी अडविण्याची गरज आहे.

कसुरा नदीवरील अनेक भागांत उन्हाळा अखेरीस पाणी टंचाई निर्माण होते. या नदीवर कोल्हापुरी मोठे बंधारे उभारून पाणीसाठा केला तर जमिनीतील पाणीपातळीत वाढ होऊन रब्बी पिकांसाठीही पाणी मिळू शकते.
-सर्जेराव लहाने, शेतकरी,
आहेर बोरगाव, ता. सेलू

Back to top button