नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती

बाजार समितीचा आखाडा www.pudhari.news
बाजार समितीचा आखाडा www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे विशेषत: लक्ष अधिक लागले आहे. आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत पिंपळगाव बाजार समितीचे नाव आहे. त्यात राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सन 2015 ची निवडणूक या दोन्ही नेत्यांनी बिनविरोध केली खरी. मात्र, कार्यकर्ते नाराज झाल्याने आजी-माजी आमदारांना तोंड द्यावे लागले. आता यावेळचे चित्र वेगळे आहे. स्थानिक पातळीवर मागील निवडणुकीत आमदार म्हणून अनिल कदम होते. तर आता दिलीप बनकर आमदार आहेत. त्यात दोघेही विरोधी आघाडीचे होते. आता मात्र दोघेही महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे मागील वेळेपेक्षा चित्र वेगळे असल्याने निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.

लासलगाव व येवला बाजार समितीत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घातले आहे. येवला बाजार समितीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनलची तयारी आहे. मात्र, पॅनलमध्ये शिवसेना आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, संभाजी पवार यांच्या मर्जीवर सर्व काही राहणार असून, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे भुजबळ विरुद्ध दराडे असा सामना रंगणार का, याकडे लक्ष आहे. लासलगाव बाजार समितीतही भुजबळ यांचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे. मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील यांचे पॅनल रिंगणात उतरणार असून, त्यांना भुजबळ यांची साथ राहील, असे चित्र आहे. त्यांच्या विरोधात माजी सभापती पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र डोखळे यांचे पॅनल राहणार आहे. त्यामुळे येथे भुजबळ विरुद्ध राष्ट्रवादीचे थोरे, भाजपचे डी. के. जगताप अशी लढत रंगणार आहे. नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याशी दोन हात करण्यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी सहकारात एन्ट्री करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरते का याकडे लक्ष राहणार आहे. त्यामुळे येथे आजी-माजी खासदारांमध्ये सामना होण्याची चिन्हे आहेत. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारी केली आहे. नांदगाव बाजार समितीत आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा पॅनल उतरविले असून, त्या विरोधात माजी आमदार अनिल आहेर यांसह महाविकास आघाडीचे नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. सिन्नर बाजार समितीत विद्यमान आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या पॅनलला टक्कर देण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे पॅनल करत आहेत. त्यामुळे आजी-माजी आमदारांमध्येच ही लढत होणार हे निश्चित मानले जात आहे. दिंडोरी बाजार समितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनलची मोट बांधली जाण्याची शक्यता आहे. त्या विरोधात माजी आमदार धनराज महाले भाजपला सोबत घेऊन पॅनल करण्याच्या तयारीत आहेत. चांदवड बाजार समितीत सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचा पॅनल राहणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्याविरोधात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दंड थोपटले आहेत. याबरोबरच कळवण, घोटी, सुरगाणा या बाजार समित्यांचीही निवडणूक होत असून, स्थानिक आजी-माजी आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करणारे नेते या निवडणुकीत विशेष लक्ष घालत असून, आपापल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या तयारी करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news