Market Committee Election : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात | पुढारी

Market Committee Election : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाने या निवडणुका कधी होतील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपले अस्तित्व असावे यासाठी लोकप्रतिनिधी बाजार समितीत नशिब आजमावत असल्याचे चित्र आहे. त्यातही मिनी मंत्रालयातले अर्थात जिल्हा परिषदेचे आजी- माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या आराखड्यात उभे ठाकले आहेत.

जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर आता लक्ष लागले आहे ते माघारीकडे. एकदा उमेदवारी अर्ज माघारी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. प्रत्येक राजकीय व्यक्ती आपले वर्चस्व दाखविण्यासाठी या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद अशा सर्वच तयारीनिशी उतरलेली दिसत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव, नाशिक बाजार समितीच्या निवडणुका होत असल्याने याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. निवडणूक बाजार समित्यांची असली तरी, ट्रेलर मात्र विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचाच आहे. त्यामुळेच यात आजी-माजी आमदारही दंड थोपटत संपूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरले आहेत.

जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील 252 जागांसाठी विक्रमी 2 हजार 420 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने एका जागेसाठी 9 ते 10 उमेदवार स्पर्धेत असल्याचे सध्याचे चित्र आहे. अंतिम चित्र दि. 20 एप्रिल रोजी माघारीनंतरच स्पष्ट होईल. प्रत्येक बाजार समितीत पॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील आजी-माजी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम आजी-माजी आमदारांकडून होणार आहे. त्यामुळे रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी आहे. 

हेही वाचा : 

Back to top button