नाशिक : गौरव अहिरे
कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याचे वास्तव दरवर्षी समोर येत असते. त्यामुळे राज्यातील कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याची क्षमता वाढवली जाते. गत दोन आर्थिक वर्षांत राज्यातील कारागृहांमध्ये सहा टक्के म्हणजेच 1 हजार 361 बंदी क्षमता वाढवण्यात आली. मात्र याच कालावधीत 15 टक्के बंदी वाढले आहेत. त्यामुळे वाढीव क्षमताही अपुरी पडत असून राज्यातील कारागृहांमध्ये सद्यस्थितीत 38 टक्के जादा बंदी राहात आहेत.
राज्यात 9 मध्यवर्ती कारागृह, 28 जिल्हा कारागृह, 1 विशेष कारागृह, 1 किशोर सुधारालय, 1 महिला कारागृह, 19 खुले कारागृह यांसह 1 खुली वसाहत असे 60 कारागृह आहेत. दि. 31 मार्च 2021 च्या अहवालानुसार राज्यातील कारागृहांमध्ये 24 हजार 32 बंदी क्षमता होती, तर प्रत्यक्षात 35 हजार 136 बंदी राहात होते. त्यामुळे बंदी क्षमता वाढवण्यात आली. त्यानुसार या कारागृहांमध्ये 31 मार्च 2023 च्या अहवालानुसार 1 हजार 361 बंदी क्षमता वाढवल्याने एकूण 25 हजार 393 बंदींना ठेवण्याची क्षमता झाली आहे. मात्र या कारागृहांमध्ये प्रत्यक्षात 40 हजार 905 बंदी राहात आहेत. त्यामुळे कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा 38 टक्के जास्त बंदी राहात असल्याचे वास्तव आहे. राज्यातील 60 पैकी 16 कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याचे आढळून आले आहे.
कारागृह प्रकार बंदी क्षमता प्रत्यक्ष बंदी
मध्यवर्ती कारागृह 16,110 27,968
जिल्हा कारागृह 7,030 10,638
विशेष कारागृह 246 233
महिला कारागृह 262 304
किशोर सुधारालय 105 05
खुले कारागृह 1,612 1,747
खुली वसाहत 28 10
गत दोन वर्षातील स्थिती
38 टक्के जादा कैदी राहतात
15 टक्के कैदी वाढले
6 टक्के क्षमता वाढवली
राज्यातील कारागृहांमध्ये 39 हजार 323 पुरुष व 1 हजार 560 स्त्री तसेच 22 तृतीयपंथी बंदी आहेत. त्यातील 8 हजार 267 बंदींना शिक्षा सुनावण्यात आली असून, 32 हजार 431 बंदी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर 207 बंदी स्थानबद्ध किंवा इतर कारवायांमुळे कारागृहात आहेत.