आरफळ, कृष्णा कालव्यात तातडीने पाणी सोडा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा : आ. डॉ. विश्वजीत कदम | पुढारी

आरफळ, कृष्णा कालव्यात तातडीने पाणी सोडा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा : आ. डॉ. विश्वजीत कदम

पलूस पुढारी वृत्तसेवा : पलूस तालुक्यात आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई व जनावरांच्या पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागल्यानेतसेच पीके वाळून निघाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आरफळ योजना व कृष्णा कालव्यात तात्काळ पाणी सोडावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला आहे.

आरफळ योजनेचे पाणी पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे ,सांडगेवाडी, कुंडल आणि पलूसच्या काही भागात जाते. तर कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने शेती धोक्यात आली आहे. सद्या ऊस, द्राक्षे, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडणेसंबंधी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रे दिली. निवेदने दिली. पाटबंधारे अधिकाऱ्या बरोबर दोन वेळा बैठका व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत कालवा सल्लागार समितीची एक वेळा बैठक झाली. शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्यासाठी पाणी देणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. मात्र, अद्यापही पाटबंधारे विभागाने पाणी सोडले नाही. असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

आरफळ योजनेत धरणातील पाणी सोडण्यासाठी अगदी अल्प काम बाकी आहे ते प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे. आरफळ व कृष्णा कालव्याला पाणी नसल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने आरफळ योजना व कृष्णा कालव्यात तातडीने पाणी सोडावे. अन्यथा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्याचा इशारा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिला आहे.

Back to top button