कोल्हापूर : कमी किमतीत सोने देण्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा | पुढारी

कोल्हापूर : कमी किमतीत सोने देण्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा

शिये : पुढारी वृत्तसेवा ” image=”http://”][/author]

हालोंडी व हेरलेसह परिसरातील लोकांना कमी किमतीत सोने देतो, असे सांगून 15 जणांना दीड कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या हालोंडी (ता. हातकणंगले) येथील दत्तात्रय मारुती जामदार ऊर्फ डीजे याला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी त्याच्या सासरवाडीतून अटक केली. याबाबत हालोंडीतील दोघांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

एवढी मोठी फसवणूक होऊनही तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याने संशयित खुलेआम फिरत होता. तसेच तो हालोंडीतून बाहेर गेल्याने तपास थांबला होता. सोने देऊ शकत नसल्याने त्याने तक्रारदारांना धनादेश दिला होता. परंतु तो न वटल्याने एकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे डीजेवर वॉरंट काढण्यात आले होते.

डीजेने एका खासगी सावकाराकडून पैसे घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये छोटा व्यवसाय सुरू केला. यातून तो एका बँक अधिकार्‍याच्या संपर्कात आला. या ओळखीतून त्याला बँक लिलावातील ोने कमी किमतीत मिळाले. हेच सोने त्याने संबंधित खासगी सावकाराला दिले. यातून काहींनी स्वतःहून त्याच्याकडे रक्कम देत पुढच्या लिलावातील सोने आम्हाला दे, असे सांगितले. याचा गैरफायदा घेत डीजेने गुंतवणूकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली.

हालोंडी व हेरले येथील सुमारे 15 जणांनी कमी किमतीतील सोने मिळविण्यासाठी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते. पण एवढी मोठी रोख रक्कम कोठून आली याबाबत आपली चौकशी होईल या भीतीने ते केवळ मध्यस्थीमार्फत आपले पैसे किंवा सोने परत मिळेल या आशेवर आहेत.

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी डीजेला ताब्यात घेतल्याचे समजल्यावर फसवणूक झालेल्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. फसवणूक झालेल्यांनी शिरोली तक्रारी द्याव्यात, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी केले आहे.

अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

डीजेने आजपर्यंत सुमारे पंधरा जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्हींपैैैैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. कमी किमतीत सोने खरेदी करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली. त्यामुळे तुमचीच उलटी चौकशी लावतो, असे सांगून तो व त्याची पत्नी गुंतवणूकदारांना जानेवारी 2019 पासून टोलवत होते. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Back to top button