लवंगी मिरची : ‘परम’ पत्ता!

लवंगी मिरची : ‘परम’ पत्ता!
Published on
Updated on

तसे आम्हाला खोटे बोलणे अजिबात जमत नाही.मित्रांबरोबर पार्टीत गर्क असताना 'सौं'चा फोन आला, तरी आम्ही 'मीटिंगमध्ये आहे' वगैरे भूलथापा कधीही मारत नाही. आम्ही जिथे कुठे असू तिथला पत्ता अगदी इमान इतबारे सांगतो. एवढेच नव्हे, तर जवळपासची खूणही सांगतो. आम्ही पक्के पुणेकर असतो, तर पत्ता सांगण्यापूर्वी एखाद्या पुणेरी पाटीकडे अंगुली निर्देश करत संबंधिताचे बौद्धिक घेऊन आणि तो परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्यास अनेक गोष्टी ऐकवून मगच पत्ता सांगितला असता; पण आम्ही निघालो पक्के मुंबईकर. गाठायची ट्रेन समोर दिसत असतानाही आम्ही व्यवस्थित पत्ता आणि आजूबाजूच्या खाणाखुणा सांगितल्याशिवाय आणि संबंधिताचे समाधान झाल्याशिवाय जात नाही.

असे आम्ही मुंबईकर! पण, सध्या आम्हीच पेचात सापडलो आहोत. कारण, आम्हास सध्या परमवीर यांचाच पत्ता सापडत नाही. आम्हास संरक्षण पुरविणार्‍या माणसाचाच आम्हास पत्ता सापडू नये, यासारखे आमचे दुर्दैव ते कोणते? कॉलेजात असताना आमच्या एका मित्राची अंगठी हरवली. ती सोन्याची नव्हतीच, तर बेंटेेक्सची होती. पोरींवर शायनिंग मारण्यासाठी त्याने ती बनवून घेतली होती. बेंटेक्सची असली तरी तिच्यासाठी पैसे मोजावे लागलेच होते. त्यामुळे तो मित्र चांगलाच खट्टू झाला होता. आमचे इतर मित्र म्हणाले, 'तुझी अंगठी हरवली आहे ना! मग, आपण पोलिसांत तक्रार करूयात.

बेंटेक्सची असली म्हणून काय झालं. शेवटी अंगठी ती अंगठीच!' त्या हरवलेल्या अंगठीची फिर्याद घेऊन आम्ही जवळच्या पोलिस ठाण्यात गेलो तेव्हा आमची तक्रार ऐकून पोलिस फिदीफिदी हसले आणि म्हणाले, 'आम्ही खरी अंगठी हरवल्याचीसुद्धा तक्रार घेत नाही आणि तुम्ही बेंटेक्सची अंगठी हरवल्याची तक्रार घेऊन आला आहात!' आजपर्यंत हरवलेली वस्तू पोलिस सापडून देतात, असा आमचा समज होता.

विश्वासही होता. त्याला पार तडा गेला. खिन्न होऊन आम्ही घरी परतलो. मनात विचार आला, आता इथून पुढे साध्या गोष्टी हरवून चालणार नाही. कारण, त्या हरवल्या तर पोलिससुद्धा त्या शोधून देणार नाहीत. म्हणून आम्ही साध्या वस्तू चीजवस्तूंपेक्षा जास्त काळजी घेऊन सांभाळतो.

आम्हास हे सारे आठवले, याचे कारण 'परमवीर' सध्या कुठे आहेत, याची कुणालाच माहिती नाही. आधी तुमचा पत्ता सांगा, असं न्यायदेवता विचारत आहे; पण त्यांचा पत्ता काही सापडत नाही. मुंबईतल्या माणसांना मुंबईतल्याच माणसाचा पत्ता सापडू नये, हे म्हणजे फारच झाले नाही का? सामान्य माणसे हरवली, तर त्यांचा शोध पोलिस घेतात; पण 'पोलिस'च हरवले, तर त्यांचा शोध कुणी घ्यायचा? त्यांचा पत्ता कसा हुडकून काढायचा? पोलिसांना पोलिसांचाच पत्ता माहीत नसणे या गोष्टीचे आम्हास खूपच हसू येते.

आता आम्ही जनतेतर्फे 'हरवलेल्या पोलिसांचा' शोध घेण्यासाठी एक नागरिकांची समिती स्थापन करणार आहोत. आपली नोकरी, धंदा वगैरे सांभाळून या समितीतील मंडळींनी या हरवलेल्या पोलिसांचा शोध घेण्याचे काम करायचे आहे. कितपत यश येईल माहीत नाही; पण यानिमित्ताने आम्ही मुख्यमंत्र्यांना या समितीतर्फे एक पत्र लिहून पोलिस हरविल्यास त्यांना शोधण्यासाठी एक नवी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी करणार आहोत.

  • झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news