स्वरदा ठिगळे साकारणार स्वराज्य सौदामिनी ताराराणी | पुढारी

स्वरदा ठिगळे साकारणार स्वराज्य सौदामिनी ताराराणी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: छोट्या पडद्यावरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर मालिकेतील मध्यवर्ती ताराराणीची भूमिका कोण साकारणार? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यासंदर्भात सोशल मीडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. आता स्वराज्य सौदामिनी ताराराणीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिची वर्णी लागली आहे.

डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. ‘जीवात- जीव आणि श्वासात- श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहिल आणि त्या औरंगजेबाची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे भाष्य आहे.

थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समध्ये अनेक नामवंत आणि नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या होत्या. या सगळ्यातून स्वरदा ठिगळे हिची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.

मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा अभिनयासोबत घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण आहे. या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने स्वरदाने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणाऱ्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button