

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील अटक असलेला संशयित आराेपी बॉलिवूड, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Aryan Khan ) हा मागील काही वर्षांपासून ड्रग्जचे नियमित सेवन करत होता, असा युक्तीवाद 'एनसीबी'च्या वकिलांनी आज न्यायालयात केला. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आज दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला.
मागील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी दोन दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करत बुधवार जामीन अर्जावरील सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र बुधवारी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने यावर गुरुवारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.
आर्यन खानच्या जामीन अर्ज आज सुनावणी झाली. यावेळी 'एनसीबी'च्या वतीने युक्तीवाद करताना वकील अनिल सिंह म्हणाले की, आर्यन खान मागील काही वर्षांपासून ड्रग्जचे नियमित सेवन करत होता. तसेच त्याने विदेशातील ड्रग्जचे सेवन केले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे चरस सापडले होते. अरबाज आणि आर्यन याचे सेवन करणार होते, असा जबाब अरबाज याने दिला आहे. त्यामुळे आर्यन खानकडे ( Aryan Khan ) ड्रग्ज सापडले नाहीत, हा युक्तिवाद योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शोविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी एनडीपीएस कायद्यातील सर्व गुन्हे ह अजामीनपात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपींना जामीन देणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह अन्य पाच आरोपींची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या सर्वांची रवानगी क्वारंटाईन बराकमधून कॉमन रेलमध्ये पाठवण्यात केले आहे, अशी माहिती आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.
एनसीबीच्या पथकाने शनिवारी २ ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून ( ( Aryan Khan drug case ) ) आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना काही प्रमाणातील ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत ( Drugs case ) चौकशी सुरू केली.
एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल करून 3 ऑक्टोबरच्या दुपारी आर्यन याच्यासह अरबाज आणि मुनमुन हिला अटक केली होती.न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी आर्यन खानसह आठ संशयित आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.