Suhas Kande : अन्यथा संघर्षाची तयारी, आ. सुहास कांदे यांची उघडउघड नाराजी | पुढारी

Suhas Kande : अन्यथा संघर्षाची तयारी, आ. सुहास कांदे यांची उघडउघड नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलविलेल्या बैठकांना आमंत्रित केले जात नाही. निधीवाटप, विकासकामांचे निर्णयांत डावलले जात असून पक्षातील पदाधिकारी निवडीपासून दुर ठेवले जात असल्याबद्दल नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी उघडऊघड नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नितांत प्रेम असल्याचे सांगताना नांदगावचा विकास हेच आपले ध्येय असून प्रसंगी संघर्षाचा तयारी असल्याचा इशाराही कांदे यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये आ. कांदे नाराज नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुषंगाने शनिवारी (दि.१२) कांदेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पक्षावर आणि पालकमंत्र्यांवर आपली कोणतीही नाराजी नाही. पण, विकासकामे, निधी वितरण तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत स्थान दिले जात नसल्याची व्यथा मांडताना यावर ना. भुसेंशी चर्चा झाली नसल्याचे कांदे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकांना मित्रपक्ष भाजपा आमदारांच्या निमंत्रणाबाबत कांदे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर जिल्ह्याच्या इतिहासात माजी पालकंमत्री गिरीश महाजन व छगन भुजबळ यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांना सोबत घेऊन काम केले. दादा भुसेंच्या नेतृत्वात जिल्ह्यात आम्ही काम करतो असून त्यांच्याशी कोणताही दुरावा किंवा तक्रार नसल्याचे सांगत कांदे यांनी भुसेंना चिमटा काढला. तसेच मला निराेप देण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच निमंत्रण देणे टाळले असा टोलादेखील कांदे यांनी भुसेंचे नाव न घेता लगावला. मतदारसंघातील कामांची यादी पालकमंत्र्यांकडे दिली आहे. त्यांच्या मंजूरीच्या यादीत संबंधित कामांचा समावेश आहे का हे तपासले जाईल. संघर्ष आपल्याला नवा नसून यादीत कामांना प्राधान्य दिले नसल्यास प्रसंगी संघर्ष करण्याचा इशारा कांदेंनी दिला.

अन्याय सहन करेल : कांदे

मुख्यमंत्री नव्हे तर एकनाथ शिंदे या व्यक्तीवर मी भरभरून प्रेम करतो. ना. शिंदे हे माझ्यावर अन्याय करणार नाहीत, असा आत्मविश्वास मला असल्याचे आ. कांदे यांनी बोलून दाखविला. करंजवण योजनेला ५० काेटींचा निधी कमी पडत असताना मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून तो निधी उपलब्ध करून देत ६०० कोटींच्या कामांला मंजूरी दिली. त्यामूळे शिंदे यांच्यासाठी जन्मभर अन्याय सहन करायची तयारी असल्याचे कांदे म्हणाले.

ना. भुसेंसाठी मीच पत्र दिले

मंत्रीपदासाठी पक्षाकडून मला विचारणा झाली होती. परंतू, चारवेळेस निवडून आलेल्या दादा भुसे यांना या पुर्वी मंत्रीपद सांभळले असून त्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव आहे. त्या तुलनेत मी नवा आमदार असून कमी अनुभव आहे. त्यामूळे भुसे यांनाच मंत्री करताना त्यांना पालकमंत्री करावे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याची आठवण कांदे यांनी करुन दिली. 

हेही वाचा :

Back to top button