भयमुक्त बारामतीचा संकल्प पूर्ण करू : ना. प्रल्हाद सिंग पटेल यांचा आशावाद | पुढारी

भयमुक्त बारामतीचा संकल्प पूर्ण करू : ना. प्रल्हाद सिंग पटेल यांचा आशावाद

बारामती; पुढारी वृत्तसेवा : भयमुक्त बारामती बनविण्याचा संकल्प २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पूर्णत्वाला जाईल. येथून भाजपचे कमळ फुललेले दिसेल, असा आशावाद केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी व्यक्त केला.
बारामतीतील भाजप कार्यालयाला पटेल यांनी शनिवारी (दि.१२) भेट दिली. यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती.

ना. पटेल म्हणाले, २०२४ ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. तो देशाचा पंतप्रधान निवडेल आणि इथे येवून जनतेची सेवा करेल, असा विश्वास व्यक्त करून पटेल म्हणाले, या दुनियेत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी तर ती कधीच नसते. अत्यंत कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. आज देशभर पक्षाचा विजय रथ दौडतो आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम करण्याची पद्धत बदलली आहे. बारामतीत ज्यांच्या भितीची चर्चा होते, ते स्वतः भयभीत झाले आहेत. आमच्यासोबत राहिला नाहीत तर विकास होवू देणार नाही, अशी भिती दाखवली जात आहे. ताकदीचा काहींना गर्व होता. विकासकामांत भेदभाव केला जात होता. चेहरा पाहून कामे केली जात होती. परंतु ती वेळ आता गेली आहे. भाजपचा विजयी कोणीही रोखू शकत नाही. जी गोष्ट नाॅर्थ -इस्टमध्ये जे आतंकवादी करू शकले नाहीत, नक्षलवादी करू शकले नाहीत, मग तुम्ही कोणती मोठी ताकद आहात, असा सवाल पटेल यांनी केला.

भाजपमध्ये केंद्रीय अध्यक्षपासून ते शहराध्यक्षापर्यंतच्या कोणत्याही पदावर सामान्य व्यक्तिला संधी मिळू शकते. इतर पक्षांमध्ये अशी नेतृत्व बदलाची ताकद नसल्याचे ना. पटेल म्हणाले. २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. त्यानंतर गेली आठ वर्षे विविध योजना राबविल्या जात आहेत. उजाला, उज्ज्वला, स्वच्छता, शेतकरी सन्मान निधी अशा योजना राबविल्या गेल्या.

२०१९ ला पुन्हा संधी मिळाल्यानंतर हर घर जल योजना हाती घेतली गेली. आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती-धर्माचे सरकार आहे हे बघत नाही. जी योजना आणतो ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपकडून केला जातो. घरे, गॅस, शौचालय यासंबंधीच्या योजनात आम्ही कधीही भेदभाव केला नाही. बारामतीची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक बुथवर आपला कार्यकर्ता असला पाहिजे, त्यासाठी संघटन अधिक मजबूत करू. भाजपकडील टीम अनुभवी आहेत. त्यामुळे २०२४ ला परिवर्तन नक्की होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

ते भयमुक्तीचे प्रमाणपत्र असेल
२०२४ ला बारामतीतून भाजपचा खासदार निवडून जाईल. त्या खासदाराला जिल्हाधिकारी जेव्हा विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देतील ते प्रमाणपत्र येथील जनतेच्या भयमुक्तीचे प्रमाणपत्र असेल. भयमुक्त तर तुम्ही त्यापूर्वीच झालेला असाल. परंतु प्रमाणपत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले असेल, असे ना. पटेल म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने उत्तर द्यावे
२०१९ ला जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रात ३८ टक्के जनेतला नळाद्वारे पाणी मिळत होते. २०२२ ला ही आकडेवारी ७१ टक्क्यांवर गेली. दुसरीकडे शेजारील गोवा राज्यात भाजपचे सरकार होते. तेथे १०० टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळाले. महाराष्ट्रात हे का घडू शकले नाही, याचे उत्तर मागील महाविकास आघाडी सरकारने द्यावे. त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी ना. पटेल यांनी केली.

 

 

Back to top button