खेडच्या एमआयडीसीतील अनेक रस्त्यांना खड्डे | पुढारी

खेडच्या एमआयडीसीतील अनेक रस्त्यांना खड्डे

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन क्षेत्रातील नवीन रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. एमआयडीसी रस्ते विभागाच्या अधिकार्‍यांचा या समस्येकडे काणाडोळा झाला आहे. सावरदरी, वराळे, वासुली, शिंदेगाव, भांबोली, खालुंब्रे या सहा गावांच्या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) वसाहतींचा टप्पा क्रमांक दोनमध्ये अनेक नामवंत राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. कंपन्यांच्या जाळ्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे.

काही महिन्यांपूर्वी भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी व नव्याने आलेल्या फोटॉन कंपनीच्या बाजूने नवीन रस्त्याचे काम करून तो रस्ता मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसीला जोडला आहे. सध्या या नव्याने केलेला रस्ता जागोजागी उखडला असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. कंपन्यांची अवजड वाहने दिवस-रात्र या रस्त्याने जात असल्यामुळे आणि रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांतून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

तसेच ज्या रस्त्याच्या भागात खड्डे पडलेत असा भाग सोडून काही चालक दुसर्‍या विरुद्ध बाजूने जातात. त्यामुळे समोरासमोर आलेल्या वाहनांचे अपघात अनेक वेळा झाले आहेत. ठिकठिकाणी रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले असून, गुण नियंत्रण मंडळाकडून रस्त्याच्या कामाची तपासणी होणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाले असल्यास संबंधित काम करणार्‍या एजन्सीवर कारवाईची आवश्यकता आहे.

एमआयडीसीने रस्त्यावर पाहिजे तिथे गतिरोधक उभारले नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मागणी करूनही गतिरोधक उभारले जात नाहीत. एमआयडीसी अस्तित्वात येऊनही अजूनही काही रस्ते पूर्वीच्याच विभागाकडे असल्याने रस्त्यावर गतिरोधक कुणी उभारायचे, हा प्रश्न निर्माण होत आहे.

                                                     – दिनेश लांडगे, सरपंच, वराळे

गावाच्या परिसरात रस्त्याला खड्डे पडले असून एमआयडीसी विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करूनदेखील दुरुस्ती होत नाही. कंपन्यांमुळे परिसरात नागरीकरण वाढले आहे. एमआयडीसी विभागाने रस्ते सुस्थितीत म्हणजे खड्डेमुक्त ठेवणे गरजेचे आहे.
                                                        – सोनाली पाचपुते, सरपंच, वासुली

Back to top button