इंदापूर येथे बनावट महिला उभी करून दुय्यम निबंधकांची फसवणूक | पुढारी

इंदापूर येथे बनावट महिला उभी करून दुय्यम निबंधकांची फसवणूक

इंदापूर; वृत्तसेवा : हक्कसोड पत्र बनवण्यासाठी बनावट ओळखपत्र आणि बनावट महिला उभी करून इंदापूर दुय्यम निबंधक यांच्यासह एका महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुमन नारायण भगत (रा. मळद, ता. बारामती) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर बोराटवाडी (ता. इंदापूर) येथील वडिलोपार्जित जमीन लाटण्यासाठी सख्खे भाऊ आणि बहिणींनी आपले बनावट ओळखपत्र बनवले. या बनावट ओळखपत्रासह आपल्या जागी सिंधूबाई दत्तात्रय भगत या बनावट महिलेला दुय्यम निबंधक (इंदापूर) यांच्यापुढे उभे केले. त्याआधारे फेब—ुवारी 2020 मध्ये हक्कसोड पत्राचा बनावट दस्त (672/2020) बनवण्यात आला.

याप्रकरणी गणपत जयवंत क्षीरसागर, पोपट जयवंत क्षीरसागर, बाळू जयवंत क्षीरसागर, भामाबाई दिलीप भगत, योगेश बाळू क्षीरसागर, ज्ञानेश्वर पोपट क्षीरसागर, नारायण बाबू क्षीरसागर, महादेव मारुती क्षीरसागर, (सर्व रा. खोरोची, ता. इंदापूर), जनाबाई विष्णू खरात (रा. थोरातवाडी, सणसर, ता. इंदापूर) आणि सिंधूबाई दत्तात्रय भगत (रा. तोंडले बोंडले, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button