खोर : वरवंडच्या भुयारी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

खोर : वरवंडच्या भुयारी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर

खोर; पुढारी वृत्तसेवा : वरवंड (ता. दौंड) येथील भुयारी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रश्न कधी सुटला जाणार, याकडे वरवंडकरांचे लक्ष लागले आहे. पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम 2012 मध्ये हाती घेण्यात आले. रस्त्यालगत असलेल्या गावांना फाटा देत उड्डाणपूल करण्यात आले मात्र खरे. पण, आज याच उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाचा वरवंड गावाला मोठा फटका बसत आहे.

पुलाच्या बोगद्यात एकमार्गी रस्ता केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत  आहे.  नागरिकांना व वयोवृद्ध प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वरवंड हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून ते उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने आज दौंड तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी हे शिक्षण घेण्यास येत असतात. यात्रा उत्सव देखील मोठा या ठिकाणी भरत असतो. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देखील  मुक्कामी वरवंड या ठिकाणी थांबत असतो. अशा प्रत्येक वेळी या एकमार्गी असलेल्या पुलाच्या बोगद्यात मोठी वाहतूक कोंडी होत असते.
दोनपदरी भुयारी मार्ग व्हावा म्हणून वरवंड ग्रामपंचायतीने विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, आजपर्यंत याबाबतचा तिढा सुटला नाही. आमदार कुल यांनी याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर उड्डाणपुलाच्या ठिकाणी भुयारी मार्गात दोन रस्ते बनविण्याबाबतीत विचारविनिमय केला पाहिजे.

यवतला चुकीच्या पद्धतीने केलेल्या उड्डाणपुलामुळे आज कित्येक प्रवासी रस्ता ओलांडताना मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटस, कुरकुंभ या ठिकाणच्या उड्डाणपुलात केलेल्या दोन पदरी रस्त्याप्रमाणे वरवंड येथील उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात रस्ता बनविण्याची मागणी पुढे आली आहे.

ग्रामस्थ बजावतात वाहतूक नियंत्रकाची भूमिका
वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्याने यात्रोत्सव काळात दोन-दोन तास वाहनांची कोंडी निर्माण होते. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दशरथ दिवेकर व त्यांचे सहकारी हे दरवर्षी यात्राकाळात वाहतूक नियंत्रकाचे काम करून समस्या सोडवत आहेत.

Back to top button