रेल्वे प्रवाशांना लुटणार्‍या औरंगाबादच्या 4 महिला जेरबंद | पुढारी

रेल्वे प्रवाशांना लुटणार्‍या औरंगाबादच्या 4 महिला जेरबंद

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  मेल, एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटणार्‍या औरंगाबादच्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. या टोळीतील 4 महिलांच्या अटकेमुळे मुंबई व ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली असून कारवाईदरम्यान पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला
आहे.

महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुधवारी दै. पुढारीला दिली. श्रेया कावले (40) या सिंधुदुर्ग येथील मूळगावी जाण्यासाठी ठाणे स्थानकात आल्या होत्या. फलाट क्र. 5 वर आलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चढत असताना चोराने त्यांच्या पर्समधील 1 लाख 13 हजार 359 रुपयांचे दागिने चोरले.

एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. श्रेया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, अशाच प्रकारे दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्र. 4 वरील जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चढताना शोभा परब (67) यांच्या शोल्डर बॅगमधील पर्स चोराने पळवली. त्या पर्समधील मोबाईल, रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण 44 हजारांचा मुद्देमाल होता.

या प्रकरणी दादर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही गुन्ह्यांची कार्यपद्धती पाहता चोरांची टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्‍त करून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्‍त कैसर खालिद यांनी दिल्या. त्यानुसार दादर, ठाणे लोहमार्ग पोलिसांसह ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गुन्ह्यांचा तपास करू लागले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण केले असता व खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार आरोपींची माहिती पोलिसांना समजली.

सदर माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, सपोउनि शेडगे, महिला हवालदार केजळे, शिंदे, महिला पोलीस नाईक पाटील व इतर पोलीस पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले. सापळा लावून लोहमार्ग पोलिसांनी सुमित्रा भोसले (40), प्रियंका भोसले (22), रातराणी पवार (28), शीला काळे (23) यांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान या आरोपी महिलांकडून चोरलेल्या एकूण मुद्देमालांपैकी 97 हजार 556 रुपयांचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांना पोलिसांचे आवाहन

रेल्वेने प्रवास करताना आपल्या सामानांची काळजी स्वत: घेणे अनिवार्य आहे. प्रवासादम्यान कोणीही संशयास्पद व्यक्‍ती अथवा वस्तू रेल्वेत, स्थानकात निदर्शनास पडल्यास त्वरित 1512 या क्रमांकावर संपर्क साधा. अवघ्या काही मिनिटांत लोहमार्ग पोलीस मदतीसाठी दाखल होतील, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्‍त कैसर खालिद यांनी प्रवाशांना केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button