चौहान टोळीतील तिघांना सात वर्षे सक्तमजुरी; मोक्का न्यायालयाने सुनावला सव्वादहा लाखांचा दंड | पुढारी

चौहान टोळीतील तिघांना सात वर्षे सक्तमजुरी; मोक्का न्यायालयाने सुनावला सव्वादहा लाखांचा दंड

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पिता-पुत्रांना कोयत्याचा धाक दाखवून मेडिकल दुकानात घुसून खंडणीची मागणी करीत 68 हजार रुपयांची जबरी चोरी करणार्‍या टोळीप्रमुखासह तिघांना मोक्का न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 लाख दंडाची शिक्षा सुनावली.
मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला आहे. टोळीप्रमुख अमर ऊर्फ रिंकू चौहान, बिटू ऊर्फ मनप्रीत सुखदेवसिंग माही आणि दिलीप कुलवंतसिंग इंद्रजितसिंग चौहान, अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. पिंपरीतील नेहरूनगर येथील एका मेडिकल दुकानात 20 ऑक्टोबर 2015 रोजी हा प्रकार घडला.

त्यांच्यावर 2006 ते 2015 या काळात 27 गुन्हे दाखल असून, टोळीने गुन्हे करीत असल्याने मोक्का लावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्यातील हत्याराची जप्ती, फिर्यादीची साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. याचा विचार करून जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. त्यांनी तेरा साक्षीदार तपासले. तिघे आरोपी मेडिकल दुकानासमोर राहत असून, एकामेकांचे नातेवाईक आहेत. मेडिकल दुकानदाराने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली होती.

Back to top button