गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ४ आठवड्यांवरून २ आठवड्यांवर | पुढारी

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ४ आठवड्यांवरून २ आठवड्यांवर

पणजी : पुढारी वृत्तसेवा; गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चार आठवड्यांवरून दोन आठवड्यांवर आणण्यात आले आहे. आज दि. ७ जुलै रोजी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची  (पीएसी)  बैठक पर्वरी येथील सचिवालयात झाली. सभापती सभापती रमेश तवडकर यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यातील पंचायतीच्या निवडणुका १० ऑगस्ट रोजी होणार असल्यामुळे २५ दिवसांचे गोवा विधानसभेचे अधिवेशन घेतल्यास पंचायत निवडणुकीसाठी जे कर्मचारी नेमण्यात येतील. तेच विधानसभेच्याही अनेक कामांमध्ये संलग्न असतात. त्यामुळे दोन्हीकडे हे कर्मचारी पोहोचू शकणार नाहीत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले .

पंचायत निवडणूक १० ऑगस्टला होणार असल्यामुळे आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मंत्री आमदारांच्या मागणीनंतर आश्वासन देऊ शकणार नाहीत. असे दुसरे कारण मुख्यमंत्र्यांनी दिले. चार आठवड्याचे विधानभेचे  अधिवेशन दोन आठवड्यांवर आणण्याची मागणी सभापती तवडकर यांच्याकडे केली. कॉंग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते मायकल लोबो, गोवा फॉरवर्डचे आमदार व अध्यक्ष  विजय सरदेसाई तसेच आप आणि आरजी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला तीव्र विरोध केला.

 विधानसभेचे अधिवेशन ठरल्यानुसार पंचवीस दिवस घ्यावे

मात्र मुख्यमंत्र्यांनी पंचवीस दिवस अधिवेशन घेतले तर पंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी कुठून आणायचे ? असा प्रश्न करून  विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर सभापतींनीही विरोधकांना मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य करण्याची सूचना केली.  विरोधकांनी  मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य करताना हे अधिवेशन दोन आठवडे  घेणार असाल तर या अधिवेशनातील उर्वरित दिवस पुढील अधिवेशनामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. यावर सभापतीनी पुढच्या पीएससी बैठकीच्या वेळी यावर निश्चित विचार करू. असे आश्‍वासन विरोधकांना दिले. त्यामुळे गोवा विधानसभेचे जुलै महिन्याच्या  ११ तारखेपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन आता  चार आठवड्यांच्याऐवजी दोन आठवडे होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

मायकल लोबो यांची टीका

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजच्या बैठकीमध्ये आचारसंहिता लागणार असल्यामुळे विधानसभा अधिवेशन कमी करण्याची मागणी केली आहे. ती न पटणारी असल्याची टीका  विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button