सराफाचा सराफावरच दरोडा; आसेगावच्या गुन्ह्याचा पर्दाफाश | पुढारी

सराफाचा सराफावरच दरोडा; आसेगावच्या गुन्ह्याचा पर्दाफाश

औरंगाबाद पुढारीवृत्तसेवा :  आसेगावहून माळीवाड्याकडे जाणाऱ्या सराफाला लुटणाऱ्या दरोडेखोरांचा पोलिसांनी बुधवारी (दि. 6) अखेर पर्दाफाश केला. तिघांना गजाआड करून आठ किलो 881 ग्रॅम चांदी, मोबाइल, दुचाकी असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, उधारी न्यायला आलेल्या सराफावर सराफानेच कट रचून दरोडा घातल्याचे तपासात समोर आले. गुन्हे शाखेने या
आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा केला.

शरद नानासाहेब पवार (30, रा. गंधेश्वर, ता. कन्नड, सध्या रा. माळीवाडा), प्रवीण फकीरचंद पवार (32), नंदकुमार हरिश्चंद्र निळे (35, रा. दोघेही शरणापूर), आनंद राजपूत ऊर्फ लकवाल (रा. बिडकीन, जांभळीवाडी, ता. पैठण) आणि गुड्डू आरण (रा. घोडेगाव, ता. जि.नगर) अशी आरोपींची नावे आहेत. यांतील शरद, प्रवीण आणि नंदकुमार हे तिघे गजाआड आहेत. अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. शरद पवार हा सराफा असून, त्यानेच कट रचून हा गुन्हा केल्याचे समोर आले. तिघा आरोपींना न्यायालयाने 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती दौलताबाद ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय गीते यांनी दिली. नतीन साहेबराव घाडगे (रा. फुलंब—ी) हे फिर्यादी आहेत. ते चांदीचे व्यावसायिक आहेत. ते जय मातादी ज्वेलर्सचा मालक शरद पवार याला मागणीप्रमाणे चांदीचे दागिने विक्री करतात. घाडगे यांची पवारकडे काही उधारीदेखील आहे. त्यामुळे ते फोन न करताच 3 जुलैला पवारच्या ज्वेलर्समध्ये आले. तेव्हा पवारचा पुतण्या दुकानात होता. त्यामुळे त्यांनी पवारला फोन केला. त्यानंतर पवार दुकानात गेला. त्याने दीडशे ग्रॅम चांदी घेतली आणि साडेचार हजार रुपये घाडगे यांना दिले. घाडगे तेथून बाहेर पडल्यानंतर आसेगाव पुलाजवळ पवारच्या तीन साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील चांदीचे दागिने असलेली बॅग हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

असा झाला उलगडा

गुन्हा घडताच गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले. त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता घटना घडल्यानंतर तिघे दुचाकीवर घाडगे यांची बॅग घेऊन जाताना, तसेच घाडगे हे आरोपींच्या दुचाकीचा एकटेच पाठलाग करताना दिसले. त्याच वेळी एक अल्टो कार त्यांच्या मागेपुढे करताना आढळली. संशयावरून माहिती घेतली असता ती कार आरोपी शरद पवारचीच असल्याचे समोर आल्याने संशय बळावला. त्यावरून पवारच्या मोबाइलचा तांत्रिक तपास केला. त्यावरून नीळ आणि प्रवीण पवार यांना उचलले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पवारला उचलले. आधीपासूनच रचला होता कट गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील यांच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपी सराफा शरद पवार याने साथीदारांसह सराफाला लुटण्याचा कट
आधीपासूनच रचलेला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Back to top button