मंगळवेढा : नुकसान भरपाई द्या, मगच काम सुरू करा | पुढारी

मंगळवेढा : नुकसान भरपाई द्या, मगच काम सुरू करा

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या फळझाडांचे नुकसान भरपाई देऊनच आष्टी उपसा सिंचन योजनेचे काम करावे, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी भीमा कालव्याचे अधीक्षक अभियंता बागडे यांना दिले.

मोहोळ तालुक्यामधून सारोळे, कोण्हेरी या भागांमधून आष्टी उपसा सिंचन योजनेचे काम चालू आहे, सदर काम होत असताना सारोळे (ता. मोहोळ) येथील शेतकरी अभिमान हांडे यांची डाळिंब बाग आहे. या झाडांचा अद्यापपर्यंत पंचनामा केला नाही. नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही. तरी देखील सदर काम करणारे ठेकेदार शेतकर्‍यांना दमदाटी करुन काम करण्याच्या तयारीत आहेत. शेतकर्‍यांच्या जगण्याचे साधन असलेली फळझाडे निघणार असतील तर त्याचे नुकसान देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्या शेतकर्‍यांनी जिवापाड जपलेली बागा उध्वस्त होणार असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. सातबारा उतार्‍यावरती 2018 पासून डाळिंब बाग असलेली नोंद आहे. तरी देखील त्या शेतकर्‍यावर प्रशासन अन्याय करत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि असा अन्याय सहन करणार नाही.

एका बाजूला शेतकर्‍यांच्या बागेवरती नैसर्गिक संकट येऊन मर रोगामुळे डाळींब बागा उद्ध्वस्त होत आहेत. त्यामधूनसुद्धा शेतकरी महागडी औषधे फवारून डाळिंब बागा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी शेतकर्‍यांच्या झाडाचे नुकसान भरपाईची रक्कम दिल्याशिवाय जर काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबाला घेऊन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुदगल, नागेश डांगे, रवी गोवे आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या फळझाडाची नुकसान भरपाई न देता प्रशासन व ठेकेदार जर शेतकर्‍यांना धमकावून काम करण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा. मा.खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त शेतकर्‍यांना घेऊन मोठे जनांदोलन उभा करू.
– युवराज घुले
जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Back to top button