राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढला! | पुढारी

राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढला!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरण्याची चिन्हे दिसत नसल्याने राज्यात सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यात आला आहे. आज हा निर्णय औपचारिकरित्या जाहीर झाला. लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होईल आणि ती किमान 15 दिवसांची असेल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. 1 मे रोजी सकाळी सध्याचा लॉकडाऊन संपणार होता. तो आता 15 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अर्थात वाढवलेल्या लॉकडाऊनमध्ये तूर्तास नवे निर्बंध आणलेले नाहीत. सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहतील. 

अधिक वाचा : बेड, ऑक्सिजन आणि औषधे शोधत आहात? ‘या’ ५ वेबसाईट आपल्याला मदत करतील!

दुसरीकडे महाराष्ट्रातील 18 ते 44 या वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली. मात्र लसीचा तुटवडा कायम असल्यामुळे हे मोफत लसीकरण 1 मेपासून सुरु करणे शक्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले. 18 ते 44 वयोगटातील मोफत लसीकरणाचा मुहूर्त कधी, याबद्दल कोणतीही निश्‍चिती नाही.

अधिक वाचा : ‘सहा मंत्री काही दिवसांत सीबीआयच्या दारात’

आतपर्यंत 45+, फ्रंटलाईन कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी असे गट लसीकरणासाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यांनाच डोस मिळण्याची पंचाईत झालेली आहे. त्यामुळेच मोफत लस गटागटाने दिली जाऊ शकते. 12 कोटी लशीच्या डोसेसची खरेदी करून पुढील सहा महिन्यांत राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे राज्य सरकारने उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

अधिक वाचा : ‘राज्यातील २२५ एपीएमसीत कोविड केअर सेंटर सुरू होणार’ 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले. सध्या राज्यासमोर आर्थिक चणचण असूनही 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध आहेत त्यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल. लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मोफत लसीकरणाच्या मोहिमेचा कोणताही मुहूर्त मात्र त्यांनी जाहीर केला नाही.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने राज्यात 1 मे पासून मोफत लसीकरण करण्यात येणार नाही. उत्पादक कंपन्यांकडून मे अखेरीस लस उपलब्ध होऊ शकेल. मात्र, तो साठा देखील मर्यादित असल्याने लसीकरण सुरु करता येणार नाही. राज्य सरकारची मोफत लस केवळ शासकीय रुग्णालयातच मिळेल. राज्यात 13 हजार शासकीय आरोग्य केंद्रे, रुग्णालये आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर 100 जणांचे लसीकरण केले तरी दररोज 13 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची राज्याच्या आरोग्य विभागाची क्षमता आहे, असेही टोपे म्हणाले.

Back to top button