कोल्हापुरात पावसाचे पाच तास धूमशान | पुढारी

कोल्हापुरात पावसाचे पाच तास धूमशान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनपूर्व पावसाने गुरुवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार हजेरी लावली. कोल्हापुरात सुमारे पाच तास पावसाचे धूमशान सुरू होते. रात्री 11 नंतरही पाऊस सुरूच होता. पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासह शहरात चार ठिकाणी झाडे कोसळली.

सकाळपासून वातावरण ढगाळच होते. दुपारनंतर पावसाळी वातावरण झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास जोराचा वारा सुटला. वार्‍याने रस्त्यावर धुळीचे लोट उठले, त्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांतच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. काही वेळातच पावसाचा जोर वाढला आणि रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. तासभर धुवाँधार पाऊस होता. पावसाचा काही काळ जोर इतका होता की, चार-पाच फूट अंतरावरीलही काही दिसत नव्हते. सायंकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर कमी झाला.

अचानक सुरू झालेला पाऊस तीन तासांहून अधिक काळ बरसतच राहिला. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. पावसाने घराकडे परतणारे अनेकजण उशिरापर्यंत ठिकठिकाणी अडकून पडले. पावसाचा जोर अधिक असल्याने अनेकांनी जागा दिसेल तिथे आसरा घेतला होता. बसथांबे, दुकाने, टपर्‍या, हॉटेल आदी ठिकाणी लोक दाटीवाटीने उभे असल्याचे चित्र होते. काहींनी भिजतच घर गाठले.

छोट्या व्यापार्‍यांचे नुकसान
पावसाने विक्रेत्यांसह छोटे व्यावसायिक, व्यापार्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. सायंकाळच्या बाजारावर पावसाने पाणी फिरवले. भाजी मंडईंत शुकशुकाटच होता. भाजीचेही पावसाने नुकसान झाले. जोरदार पावसापासून विक्रीसाठी ठेवलेले साहित्य सुरक्षितस्थळी हलवताना विक्रेते, व्यापारी, व्यावसायिकांची अक्षरश: धांदल उडाली. सायंकाळनंतर सुरू असणार्‍या खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्ससह अन्य व्यवसायही ठप्पच झाले.

वाहतूक मंदावली
शहरातील दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, व्हिनस कॉर्नर आणि सीपीआर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जयंती नाला ओव्हर फ्लो झाल्याने दोन-तीन दिवसांपासून साचलेला सर्व कचरा थेट पंचगंगेत मिसळला. शहरातील काही भागांत रस्त्यांनाच गटारीचे स्वरूप आले होते. गांधी मैदान व दुधाळी मैदानासह अन्य क्रीडांगणांवरही पाणी साचले. मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या पावसाचा रंकाळ्यातील बोटिंगवरही परिणाम झाला. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे तसेच पर्यटक, प्रवाशांचेही मोठे हाल झाले.

वाहतुकीवरही परिणाम
जोराचा पाऊस आणि साचलेले पाणी, यामुळे अनेक रस्त्यांवर वाहनांचा वेग संथ होता. व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. व्हिनस कॉर्नर ते गोकुळ हॉटेलदरम्यान आणि दाभोळकर कॉर्नर ते वटेश्वर मंदिरदरम्यान वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या. यामुळे एरव्ही एक ते दोन मिनिटांत पार होणारे हे अंतर सायंकाळी पार करताना वाहनधारकांना काही काळ पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी जात होता. पावसाने शहरालगच्या वीटभट्ट्यांचेही मोठे नुकसान झाले.

दोन दिवस पावसाचा अंदाज
जिल्ह्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आजरा, पन्हाळा आदी तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. आणखी दोन दिवस जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस होईल, असाही अंदाज हमावान विभागाने व्यक्त केला आहे.

Back to top button