कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमण काढण्याची कारवाई केवळ राजारामपुरीतच का? राजारामपुरीत दुजाभावाने कारवाई का? असा संतप्त सवाल करून अतिक्रमण कारवाई करायची तर सरसकट करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
राजारामपुरीतील अतिक्रमण कारवाईविरोधात शिष्टमंडळाने डॉ. बलकवडे यांची भेट घेऊन ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत व दुजाभाव करून होत असल्याचा आरोप केला. माजी महापौर सुनील कदम म्हणाले, शहरात इतरत्र कुठेही न करता केवळ राजारामपुरीतच का कारवाई केली. मोठ्यांना अभय देउन गरीबांवर अन्याय का? बैठकीतील आदेशानुसार कारवाई केली आहे. आदेश देणार्यांनी पुराचे, झूम प्रकल्पावरील कचर्याचे नियोजन केले का, अशी विचारणा पालकमंत्र्यांचे नाव न घेता केली. पालकमंत्र्यांच्या हॉटेलचा घरफाळा थकीत आहे. त्यांचे अतिक्रमण नाही का त्यांच्यावर कारवाई नाही, मग गरिबांवर का? रामचंद्र महाजन प्रत्येक वेळी आजारीकसे पडतात? असा सवाल कदम यांनी केला.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, कोणाच्या आदेशाने ही कारवाई केली हे जाहीर करावे. टीपी विभाग काय करतो? त्यांनी केवळ धार काढायची आणि शेण मात्र दुसर्यानीच काढायचे का ? माजी नगरसेवक सत्यजित कदम म्हणाले, राजारामपुरीत पार्कीगचा प्रश्न सोडविण्यासाठी अतिक्रमण कारवाईपेक्षा 2010 साली आराखड्याची अंमलबजावणी करावी. निवासी क्षेत्रात कारवाई करू नका. पावसाळा असल्याने कारवाई स्थगित करावी. पालकमंत्री घरफाळा भरत नाही त्यांच्यावर कारवाई करा. गरिबांवर कारवाई होते, मोठ्यावर का नाही?
अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, झूम प्रकल्पातील कचर्यापेक्षा घाण असणार्या नालेसफाईचे काम करा. 70 हॉस्पिटलच्या बंद पार्किंगवर कारवाई का नाही. कायदा आणि न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून कारवाई केली आहे. गरिबांवर कारवाई करून जनतेचा रोष निर्माण करीत मोठ्यावरील कारवाई बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप प्रा. जयंत पाटील यांनी केला. तर मार्केट यार्डमधील सोळा केबीन्स रस्त्यावर असून कारवाई का नाही, असा सवाल करून सुनील कदम यांनी सभागृह सोडले. यावेळी कोटीतीर्थातील केंदाळ साफ करून तलावाचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, रवींद्र मुतगी, रहिम सनदी, नजिर देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.