नाशिक : प्लास्टिकचा वापर करणार्‍या मंगल कार्यालयांवर आयुक्तांचा कारवाईचा इशारा | पुढारी

नाशिक : प्लास्टिकचा वापर करणार्‍या मंगल कार्यालयांवर आयुक्तांचा कारवाईचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणारे मंगल कार्यालय तसेच हॉल चालकांवर कारवाई करण्याबरोबरच स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचारी, अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

नाशिक महापालिकेतील रेकॉर्ड हॉल येथे मनपा आयुक्त पवार यांच्या उपस्थितीत शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत असणारे सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व घंटागाडी तसेच साफसफाई काम करणार्‍या ठेकेदारांची आढावा बैठक झाली. या बैठकीस घनकचरा विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी शहरातील सर्व विभागांतील स्वच्छतेबाबत आढावा घेतला. तसेच शहर स्वच्छतेस प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगून शहरात कुठल्याही विभागात अचानक भेट देण्यात येऊन कामचुकारपणा व गैरहजर असणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. तसेच आयुक्तांकडून कर्मचार्‍यांना विविध बाबींवर मार्गदर्शन झाले. कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शहरातील रस्ते व दुभाजकांच्या स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच दुभाजक व रस्त्याची सफाई करताना कर्मचार्‍यांना पुरेशी सुरक्षा बाळगण्याबाबत सांगण्यात आले. शहरातील सिंगल यूज प्लास्टिक वापरणारे मंगल कार्यालय, हॉल यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले. तसेच वारंवार प्लास्टिक कचरा फेकणार्‍यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची सूचना देण्यात आली. शहरात कुठेही कचरा साठून राहणार नाही (ब्लॅक स्पॉट) याची दक्षता घेण्याबाबत सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button