कोरोनामुळे लोक घरी बोलवायला घाबरतात | पुढारी

कोरोनामुळे लोक घरी बोलवायला घाबरतात

पुणे : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनच्या  दिवसांत काम बंद होते…आता काम सुरू झाले आहे. लोकांकडे साठलेल्या  रद्दी आणि भंगाराचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनामुळे लोक आम्हाला घरी बोलवायला घाबरतात. म्हणूनच सध्या भंगार मिळाले तरी त्यातून पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. ही व्यथा आहे भंगार वेचणार्‍या श्रमिकांची.

गेल्या अनेक दिवसांपासून भंगार व्यावसायिकांची दुकाने बंद होती. त्यामुळे भंगार गोळा करणार्‍या श्रमिकांकडे काम नव्हते. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना काम सुरू झाले आहे. पण सुरक्षेखातर लोक घरी बोलवायला तयार नसून सध्या हा व्यवसाय चालविणे कठीण जात आहे. म्हणूनच सध्या आणखी काही दिवस आर्थिक चणचण जाणवणार आहे.

शहरातील लॉकडाऊन शिथिल करताच काही व्यवसाय सोशल डिस्टन्सचे पालन करीत सुरू करण्यात आले. त्यात भंगार गोळा करणार्‍या श्रमिकांनीही काम सुरू केले आहे. मात्र, सुरक्षेचा विचार करून नागरिक आपल्याकडील भंगार आणि रद्दी श्रमिकांना द्यायला तयार नाहीत. म्हणून या श्रमिकांची आर्थिक कोंडी होत आहे. या श्रमिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. व्यवसाय पूर्वपदावर यावा आणि आमचे काम पूर्वीप्रमाणे सुरू व्हावे, अशी आशा श्रमिकांना आहे.  

याविषयी भंगार वेचणारे श्रमिक हरी म्हणाले की, मी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून भंगार गोळा करण्यासाठी शहरभर फिरत आहे. पण लोक भंगार द्यायला तयार नाहीत. भंगार घेतल्यानंतर आमच्याकडेही लोकांना द्यायला पैसे नाहीत. जे लोक भंगार देतात तेही अधिक पैशांची मागणी करत आहेत. त्यामुळे सगळीकडून अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोणी काम द्यायलाही तयार नसून, कुटुंबाची जबाबदारी पेलणे कठीण झाले आहे. या व्यवसायातून एरवी दिवसभरातून मिळणारी कमाईही थांबली  आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर संपावी असे वाटते.

Back to top button