नाशिक जिल्ह्यात चिंचेची दोन गावे, त्याला कोटींचा भाव

नाशिक : चिंचेचे गाव,www.pudhari.news
नाशिक : चिंचेचे गाव,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

अनेक कारणांनी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याची आणखी एक ओळख पुढे येत आहे. जिल्ह्यातील दोन गावे 'चिंचेचे गाव' म्हणून ओळखले जात असून, या गावातील चिंचेच्या झाडांचे प्रमाण अन् त्यामागील अर्थकारण नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिले आहे. चकीत करणारी बाब म्हणजे चिंचेच्या उत्पादनातून या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने, गावकऱ्यांनाही चिंचेचे झाड उत्पादनाचा उत्तम पर्याय ठरत आहे.

टोमॅटोच्या बाजारपेठेसाठी ओळखले जाणारे गिरणारे अन् निफाडजवळील कोठुरे या गावात जिकडे बघावे तिकडे चिंचेचे झाड नजरेस पडतात. गिरणारे गावात ३५० पेक्षा अधिक, तर कोठुरे गावात ५०० पेक्षा अधिक चिंचेची झाडे आहेत. कधीकाळी हे प्रमाण दुप्पट होते. मात्र अनेकांनी नवीन बांधकामे केल्याने, ही संख्या घटली आहे. खरे तर चिंच हे झाड सदाहरित असल्याने, सावलीसाठी या झाडांचा मोठा फायदा होतो. त्याचबरोबर चिंचेपासून अनेक गुणकारी पदार्थही बनविले जातात. विशेषत: मिठाईबरोबर खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी चिंचेपासून बनविलेली चटणी तसेच चिंचेच्या गोळ्या, चिंचेचा काढा, गर, चिंच पावडर, सॉस, लोणचे, पेय, सिरप आदींसाठी चिंचेचा वापर होत असल्याने चिंचेला मोठी मागणी आहे. अशात व्यापारीवर्ग या दोन्ही गावांमधील चिंचेची झाडेच वर्षभरासाठी खरेदी करतात. झाडांचा घेर तसेच त्याला येणाऱ्या चिंचांच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन त्याची किंमत ठरविली जाते. कमीत कमी ५ ते २० हजारांपर्यंत एका झाडाचा भाव असल्याने सिझनमध्ये या गावांमधील अर्थकारण सुसाट असते.

दरम्यान, सध्या झाडांना पानांपेक्षा चिंचाच अधिक लटकत असल्याने व्यापारीवर्ग गावांमध्ये ठाण मांडून असल्याचेही चित्र आहे. आतापासून पुढील वर्षभर व्यापाऱ्यांकडून झाडे विकत घेतली जाणार आहेत. त्यातून गावकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

दीर्घायुषी वृक्ष

देशी प्रजातीचे चिंचेचे वृक्ष दीर्घायुषी असून, ते सदाहरित असल्याने सावलीसाठी त्याचा मोठा लाभ होतो. चिंचेची झाडे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ जगतात. सावलीबरोबरच चिंच गुणकारी असून, त्याचे अनेक फायदे घेता येतात. चिंचेप्रमाणेच त्याची पानेसुद्धा उपयोगी व शरीराला लाभदायक आहेत. कारण चिंचेच्या पानात व्हिटॅमिन सी आणि टार्टारिक आम्ल असते. तसेच यात फायबर, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शिअम ही पोषणद्रव्ये आढतात. चिंचेच्या पानातील टार्टारिक आम्ल आणि व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर चिंचेपासून अनेक पदार्थ बनविता येतात. औषधातही चिंचेचा वापर केला जातो.

तिसऱ्या गावालाही मिळेल चिंचेची ओळख

नाशिक जिल्ह्यातील गिरणारे आणि कोठुळे या दोन गावांना 'चिंचेचे गाव' म्हणून ओळखले जात असून, त्यापाठोपाठ दरी या गावालाही ही ओळख मिळणार आहे. या गावात तब्बल पाच हजार चिंचेची लागवड करण्यात आली असून, त्याचे संवर्धन करण्यासाठी गावातील मंडळी पुढाकार घेत आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच उत्पन्नाचे माध्यम म्हणूनदेखील या लागवडीकडे बघितले जात आहे.

चिंचेचे झाड हे वार्षिक उत्पन्न देणारे झाड आहे. एका झाडामधून ५ ते ६ हजार रुपये वर्षाकाठी मिळतात. डेरेदार झाड असेल तर त्याची किंमत अधिक मिळते. या झाडाचे इतरही अनेक फायदे आहेत. गिरणारे हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, चिंचेचे गाव म्हणून असलेली ओळख आम्हा गावकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

– राम खुर्दळ, पर्यावरण अभ्यासक

ग्रामपंचायत, वनविभाग व दरीआई माता मित्रपरिवाराच्या वतीने दरी या गावात पाच हजार चिंचेच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. सध्या या झाडांचे संवर्धन करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारली आहे. या झाडांचे अनेक फायदे असून, उत्पन्नाचे माध्यम म्हणूनदेखील हे झाड फायदेशीर ठरत आहे.

– भारत पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य, दरी

कोठुरे गावात सद्यस्थितीत असलेल्या चिंचांच्या झाडांपासून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे गाव पेशव्यांनी वसविले असून, त्यांच्याच काळात या गावात चिंचेसह इतर वृक्षांची लागवड केली आहे. सध्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने मी गेल्या काही वृक्षांपासून ५०० हून अधिक चिंचेचे झाडे लावले असून, एक हजार वृक्ष लागवडीचा माझा निर्धार आहे.

– माधवराव बर्वे, ग्रामस्थ, कोठुरे

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news