

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास बी. डी. कामगार वसाहत गणपती मंदिराच्या मागे शिवबा मित्र मंडळ चंदननगर परिसरात घडली. ओमकार भंडारी असे जखमी तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सुफियान जाकीर तांबोळी (वय 25, रा. बाबाजी वस्ती केसनंद), हुसेन अब्दुल शेख (वय 23, रा. चौधरी वस्ती चंदननगर), इर्षाद हाजमिया बागमार (वय 32, रा. बी.डी.कामगार वसाहत चंदननगर) या तिघांना अटक केली आहे. इतर दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सागर इरावती (वय 36, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोकळ्या जागेत एक ते दीड वर्षापूर्वी आरोपी इर्षाद व सुफियान यांना शेड उभे करण्यास ओमकार भंडारी याने विरोध केला होता. त्याच कारणातून आरोपींनी कट रचून फिर्यादी व त्यांचे सहकारी ओमकार भंडारी हे गप्पा मारत बसले असताना, मानेवर, हातावर वार करून गंभीर जखमी केले.