

नगर : पुढारी वृत्तसेवा : जागा परत देण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली आहे. शोभा अर्जुन भांड, अलका बाबासाहेब भांड, सविता भिमराज भांड (सर्व रा. निंबळक ता. जि. अहमदनमर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 11 जुलै 2008 रोजी आरोपींनी फिर्यादी सिंधुबाई राधाकिसन भांड यांच्या घरी जाऊन केस ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयात फौजदारी अपिल दाखल केले होते. त्यावर आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद होऊन कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला. अपिलाचे कामकाज अॅड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहीले.