

ब्रिस्बेन : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) एक असाधारण आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात तीन बळी मिळवताच त्याने पालिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमचा (Wasim Akram) विक्रम मोडीत काढला. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून मिचेल स्टार्क सिंहासनावर विराजमान झाला आहे.
पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याने कसोटी क्रिकेटमध्ये 414 बळी मिळवले होते आणि इतकी वर्षे हा विक्रम त्यांच्याच नावावर होता. परंतु, 415 वा बळी घेताच मिचेल स्टार्कने अक्रमला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या 102 व्या सामन्यात त्याने हा विक्रमी टप्पा गाठला. हा विक्रम केवळ स्टार्कच्या सातत्यपूर्ण कामगिरीचीच नाही, तर डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याने केलेल्या वर्चस्वाची साक्ष देतो.
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : 415 बळी
वसीम अक्रम (पालिस्तान) : 414 बळी
चमिंडा वास (श्रीलंका) : 355 बळी
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) : 317 बळी
मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) : 313 बळी
ॲशेस मालिकेतील दुसरी कसोटी ब्रिस्बेनच्या द गॅबा मैदानात खेळली जात आहे. हा सामना गुलाबी चेंडूवर डे-नाईट खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टॉक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लिश संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 5 धावांवर त्यांचे दोन गडी बाद झाले.
ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच यश मिळवून देण्यात स्टार्कने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सलामीवीर बेन डकेटला (Ben Duckett) शून्यावर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने ओली पोप (Ollie Pope) यालाही भोपळाही फोडू दिला नाही. नंतर हॅरी ब्रूकला (Harry Brook) याचा 31 धावांवर त्रिफळा उडवला आणि आपला ऐतिहासिक 415वा बळी पूर्ण केला.
या सामन्यात इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि जो रूट यांनी शानदार अर्धशतके झळकावली. जो रूट अजूनही कर्णधार बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) साथीने क्रीजवर आहे. परंतु, या खेळापेक्षा अधिक चर्चा स्टार्कने केलेल्या विक्रमाची होत आहे.
मिचेल स्टार्कने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण केले. सुरुवातीच्या अडथळ्यांवर मात करत त्याने संघात आपले स्थान पक्के केले. तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नव्हे, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.
कसोटी : 415 बळी
एकदिवसीय : 247 बळी
टी-20 आंतरराष्ट्रीय : 79 बळी
ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान तोफगोळ्याने सिद्ध केले आहे की, तो एक 'मॅच-विनर' आहे. वसीम अक्रमसारख्या महान खेळाडूचा विक्रम मोडणे, हे खऱ्या अर्थाने त्याच्या कारकिर्दीतील एक सुवर्ण क्षण आहे.