

रायपूर : पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाने आपल्या जर्सीचे थाटात अनावरण केले. ‘मेन इन ब्लू’ची ही नवी जर्सी भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान मध्यंतराच्या वेळी प्रदर्शित करण्यात आली. या अनावरण समारंभात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज तिलक वर्मा यांच्यासह ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया उपस्थित होते.
नवी जर्सी गडद निळ्या रंगाची असून, बाजूला चमकदार नारंगी रंगाचे पट्टे आहेत. या डिझाईनमध्ये दोन प्रमुख बदल करण्यात आले असून, तिरंगा आता कॉलरवर हलवण्यात आला आहे आणि जर्सीच्या पुढील भागावर उभ्या निळ्या पट्ट्या जोडल्या गेल्या आहेत.
2024 मध्ये भारताला 17 वर्षांनंतर दुसरे टी-20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा आगामी 2026 विश्वचषकाचा ब्रँड ॲम्बेसेडर असून, त्याच्या हस्ते जर्सी अनावरण करण्यात आले. यानंतर तो म्हणाला, हा खूप मोठा प्रवास आहे. आम्ही 2007 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर पुढचा जिंकण्यासाठी 15 वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. आता हा विश्वचषक भारतात होत असताना माझ्या शुभेच्छा पुन्हा एकदा संघासमवेत आहेत. भारतीय संघ स्पर्धेत दर्जेदार प्रदर्शन साकारेल, याची मला खात्री वाटते.
भारताचा सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत मुंबईकडून लखनौ येथे खेळत असल्याने आणि उपकर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीतून सावरण्यासाठी बंगळूरमधील ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एŠसलन्समध्ये रिहॅबमध्ये असल्याने या अनावरण सोहळ्यात हजर राहू शकले नाहीत.
आगामी टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान होणार आहे. ही 20 संघांची स्पर्धा असून, यामध्ये इटलीसारखे संघ प्रथमच पदार्पण करत आहेत. भारत आपला पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यूएसएविरुद्ध खेळणार आहे. भारत ‘अ’ गटात असून, या गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 मध्ये जातील. 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे. पाकिस्तानच्या कामगिरीवर अंतिम फेरीचे ठिकाण निश्चित होईल.