

Salman Agha Run Out Controversy: भारतात झालेल्या टी २० वर्ल्डकपवर सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशनं खेळण्यास नकार दिला होता. या प्रकरणात पाकिस्तानने त्यांना साथ दिली होती. त्यांनी देखील भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचे नाटक केलं होतं. मात्र ऐनवेळी पलटी मारली होती.
दरम्यान, वर्ल्डकप झाल्या झाल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका आयोजित करण्यात आली. त्यातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशी खेळाडूने पाकिस्तानच्या सलमान आगासोबत असं काही केलं की अख्ख्या क्रिकेट जगतात त्याचीच चर्चा सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र बांगलादेशचा खेळाडू मेहदी हसन मिराजने जी कृती केली ती योग्य की आयोग्य अशी चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानचा सलमान आगा नॉन स्ट्राईकवर असताना गोलंदाजी करणाऱ्या मेहदी हसन मिराजला मैदानावरचा चेंडू परत देण्याचा प्रयत्न करत होता. तेवढच्या मेहदी हसनने आगा क्रीजच्या बाहेर असल्याचं हेरलं अन् क्षणाचाही विचार न करता चेंडू स्टम्पवर मारून रन आऊटची अपील केली.
नियमानुसार सलमान आगा क्रीजच्या बाहेर असल्यानं त्याला बाद ठरवण्यात आलं. तिथंच वादाला ठिणगी पडली. मेहदी हसन आणि त्याच्या या कृतीला पाठिंबा दर्शवणाऱ्या कर्णधाराने जे काही केलं ते खिलाडू वृत्तीला धरून होतं की नव्हतं. आगाने तर शिव्यांची लाखोली वाहतच मैदान सोडलं होतं.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. तो आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतो, 'हे काही योग्य झालं नाही. विकेट मिळवण्याची गरज हे या रन आऊटला न्याय ठरवू शकत नाही. कर्णधारावर देखील याची जबाबदारी येते. तरूण खेळाडूंना माझा सल्ला आहे की जरी वर्ल्डकप फायनल जरी असली तरी बांगलादेशच्या कर्णधारानं जे काही केलं ते कधी करू नका, खेळ हा खिलाडूवृत्तीशिवाय खेळ रहात नाही.'
विशेष म्हणजे सलमान आगा हा ६२ धावांवर खेळत होता. पाकिस्तानी संघ मजबूत स्थितीत होता. त्यावेळी समोरच्या फलंदाजानं पुश केलेला चेंडू सलमान आगाजवळ आला. त्यावेळी सलमान आगा क्रीजच्या बाहेर होता. मात्र त्याने धाव घेण्याची कोणती इच्छा दर्शवली नव्हती.
सलमान मेहदीला चेंडू देण्याच्या इराद्याने खाली वाकला. तेवढ्यात मेहदीला जाणवलं की आगा क्रिजच्या बाहेर आहे. त्याने त्वरित चेंडू उचलला आणि स्टम्पवर मारला. आता आगा बाद होता की नाही याबाबत क्रिकेट जगतात वाद सुरू आहे. मात्र मेहदीनं जे काही केलं ते पाहून आगा जाम चिडला होता. त्याने आपल्या हातातील ग्लोव्ह्ज फेकले.
या घटनेवर आगा म्हणाला, 'खरं तर चेंडू माझ्या पॅडवर आपटला होता. त्यानंतर तो बॅटला लागला. त्यामुळं मला वाटलं की तो मला रन आऊट करणार नाही. मी त्याला चेंडू परत देण्याचा प्रयत्न करत होतो. मला धाव घेण्याची कोणती इच्छा नव्हती. मात्र त्यानं मला रन आऊट करायचं हे आधीच ठरवलं होतं.
जरी चांगला खेळत असलेला सलमान आगा धावबाद झाला तरी या घटनेचा सामन्याच्या निकालावर काही परिणाम झाला नाही. पाकिस्तानने २७४ धावा उभारल्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या बांगलादेशला फक्त ११४ धावाच करता आल्या.