

दुबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या इशान किशनने आता आयसीसी क्रमवारीतही आपला दबदबा निर्माण केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या चमकदार कामगिरीचा इशानला मोठा फायदा झाला आहे.
पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने खेळलेल्या मॅच-विनिंग खेळीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या कामगिरीच्या जोरावर इशानने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत १७ स्थानांची मोठी झेप घेत थेट आठवे स्थान काबीज केले आहे.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या सध्याच्या फॉर्मवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले, तरी टी-२० क्रमवारीत त्याचे पहिले स्थान अद्याप कायम आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर असून श्रीलंकेच्या पथुम निसांकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेल्या शतकाच्या जोरावर तिसरे स्थान गाठले आहे. भारताचा तिलक वर्मा देखील एका स्थानाच्या प्रगतीसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
एकीकडे भारतीय खेळाडू प्रगती करत असताना, पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला दोन स्थानांचा फटका बसला असून त्याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. इंग्लंडचा जोस बटलर सातव्या स्थानावर गेला आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट (९ वे स्थान) आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (१० वे स्थान) यांनाही प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले असले, तरी त्यांनी टॉप-१० मध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशिद खान दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून, तो अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या वरुण चक्रवर्तीला कडवी टक्कर देत आहे. झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्स याने सलग दोन सामन्यांत प्रत्येकी तीन बळी घेत १० स्थानांची झेप घेत पाचवे स्थान पटकावले आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत पाकिस्तानच्या सईम अयुबने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा याला मागे टाकले आहे. अयुब आता जगातील नंबर-१ टी-२० ऑलराउंडर बनला आहे.