

Rohit Sharma in Pakistan XI
ढाका : येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच प्रसारकांकडून मोठी चूक झाली, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर टीकेला आणि थट्टेला सामोरे जावे लागत आहे.
शुक्रवारी (दि. ९ मे) सामना सुरू असताना, ब्रॉडकास्टर्सनी पाकिस्तानच्या खेळाडूंची आकडेवारी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानच्या संघात चक्क भारतीय खेळाडूंची नावे झळकल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. ऑन-स्क्रीन ग्राफिकमध्ये चक्क रोहित शर्माला पाकिस्तानचा कर्णधार म्हणून दाखवण्यात आले होते.या ग्राफिकमध्ये केवळ रोहितच नाही, तर शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांसारख्या भारतीय खेळाडूंची नावे होती. ही मोठी चूक सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि चाहत्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत ब्रॉडकास्टर्सना चांगलेच ट्रोल केले.
खेळाचा विचार केल्यास, पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशने मजबूत पकड मिळवली आहे. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने आक्रमक शतक झळकावत यजमान संघाला सुरुवातीच्या पडझडीतून सावरले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने ४ बाद ३०१ धावा केल्या होत्या. शांतोने अवघ्या १२९ चेंडूंमध्ये ९ वे कसोटी शतक साजरे केले. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता, ज्यामुळे शेर-ए-बांगला स्टेडियमवरील चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
बांगलादेशची अवस्था ११ षटकांत २ बाद ३१ अशी असताना शांतोने डाव सावरला. त्याने मोमिनुल हकसोबत तिसऱ्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी केली. पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी ही बांगलादेशची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. १०१ धावांवर खेळत असताना शांतो मोहम्मद अब्बासच्या चेंडूवर पायचीत (LBW) झाला.
मोमिनुल हकने शांतोच्या खेळीचे कौतुक करताना म्हटले की, "शांतोची ही खेळी मी पाहिलेल्या त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दबावाखाली असूनही तो शतक झळकावतोय. आज देखील त्याने कठीण परिस्थितीत हे शतक केले, तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यात आहे."