T20 World Cup Final : भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता! अहमदाबादमध्ये किवींचा ९६ धावांनी धुव्वा उडवत रचला इतिहास

T20 World Cup Final : सलग दोन विश्वचषक जिंकणारा भारत जगातील एकमेव देश
t20 world cup final India vs New Zealand IND vs NZ Final Live
Published on
Updated on

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचा नवा अध्याय लिहिला गेला. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम महायुद्धात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. २००७ आणि २०२४ च्या यशानंतर आता २०२६ मध्येही तिरंगा डौलाने फडकला असून, सूर्यकुमार यादवचे नाव आता विश्वविजेत्या कर्णधारांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले आहे.

धावांचा पाऊस...

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा विश्वविक्रमी डोंगर उभा केला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारताने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या १७६ धावांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.

संजू-अभिषेकची वादळी सुरुवात

सलामीवीर अभिषेक शर्माने फॉर्ममध्ये पुनरागमन करत अवघ्या २१ चेंडूंत ५२ धावांची फटकेबाजी केली. त्याने संजू सॅमसनसोबत पहिल्या विकेटसाठी केवळ ४३ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर संजू सॅमसनने आपल्या बॅटची जादू कायम राखत सलग तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने ४६ चेंडूंत ५ चौकार आणि ८ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. त्याला इशान किशनने (२५ चेंडूंत ५४ धावा) चोख साथ दिली. एका वेळी भारत ३०० धावा करेल असे वाटत होते, मात्र १६ व्या षटकात जेम्स नीशमने तीन बळी घेत धावगतीला लगाम घातला. अखेरच्या षटकात शिवम दुबेने ८ चेंडूंत नाबाद २६ धावा कुटल्यामुळे भारताने २५० चा टप्पा ओलांडला.

न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत खुर्दा

२५६ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था अत्यंत बिकट झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर किवींचा संपूर्ण संघ १९ व्या षटकात १५९ धावांत गारद झाला. न्यूझीलंडकडून केवळ टिम सायफर्ट (५२) आणि मिचेल सँटनर (४३) यांनी थोडा प्रतिकार केला. डॅरिल मिचेलने १७ धावा केल्या, मात्र इतर एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही.

भारताच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • तिसरा विश्वचषक: २००७ आणि २०२४ नंतर तिसऱ्यांदा जगज्जेतेपदाचा मान.

  • विक्रमी धावसंख्या: फायनलमधील २५५/५ ही ऐतिहासिक धावसंख्या.

  • सूर्यकुमारची कप्तानी: रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जागतिक वर्चस्व राखले.

  • अहमदाबादचे मैदान आज 'वंदे मातरम'च्या जयघोषाने दुमदुमले असून, सलग दोन वेळा विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने आपल्या जादुई स्पेलने न्यूझीलंडच्या फलंदाजीचे अक्षरशः लचके तोडले आहेत. जिमी नीशमला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर बुमराहने मॅट हेन्रीला (० धावा) त्रिफळाचीत करून माघारी धाडले.

अशी मिळाली विकेट:

बुमराहने पुन्हा एकदा आपल्या अचूक 'स्लोअर बॉल'चा वापर केला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने खाली राहिला आणि थेट 'ऑफ स्टंप'वर जाऊन धडकला. हेन्रीला या चेंडूचा कोणताही अंदाज आला नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला.

बुमराहच्या या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा संघ आता पूर्णपणे कोलमडला असून भारताचा ऐतिहासिक विजय आता केवळ औपचारिकता उरली आहे.

बुमराहचा 'स्लोअर' बॉल अन् नीशमचा त्रिफळा

जसप्रीत बुमराहने आपल्या जादुई गोलंदाजीने न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या आहेत. डावातील १६ व्या षटकात बुमराहने धोकादायक फलंदाज जिमी नीशमला (८ धावा) त्रिफळाचीत करून माघारी धाडले आहे.

अशी मिळाली विकेट:

बुमराहने टाकलेला संथ गतीचा 'फुल टॉस' (Slower Full Toss) चेंडू नीशमला वाचता आला नाही. त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वेगाने खाली राहत थेट मधल्या आणि लेग स्टंपच्या मुळावर जाऊन धडकला. बुमराहच्या या अचूक माऱ्याने नीशम पूर्णपणे चकवा खाऊन बाद झाला.

भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल आज ज्या चेंडूला हात लावत आहे, त्याचे सोने होताना दिसत आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरिल मिचेल (१७ धावा) बाद झाल्याने किवींची स्थिती आता पूर्णपणे कोलमडली आहे.

अशी मिळाली विकेट:

अक्षरने टाकलेला एक 'फुल टॉस' चेंडू मिचेलला सीमापार धाडण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, चेंडू बॅटवर नीट न आल्याने तो थेट डीप मिडविकेटला उभ्या असलेल्या इशान किशनच्या हातात विसावला. इशान किशनने आजच्या सामन्यातील आपला तिसरा झेल टिपत किवी फलंदाजांना रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

अक्षर पटेलने पुन्हा एकदा भारताला महत्त्वाच्या क्षणी यश मिळवून दिले असून विजयाचे अंतर आता केवळ काही पावलांवर उरले आहे.

न्यूझीलंडची दाणादाण! हार्दिक पंड्याने चॅपमनचा त्रिफळा उडवला

टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर सुरूच आहे. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर आता अष्टपैलू हार्दिक पांड्याने न्यूझीलंडला चौथा मोठा धक्का दिला आहे. डावातील आठव्या षटकात हार्दिकने मार्क चॅपमनला (३ धावा) त्रिफळाचीत करून माघारी धाडले.

अशी मिळाली विकेट:

हार्दिकने टाकलेला १३५ किमी वेगाचा चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर जात होता. चॅपमनने पाय न हलवता तो कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची आतली कडा घेऊन थेट यष्ट्यांवर आदळला. हार्दिकने आपल्या स्पेलमधील गतीचा प्रभावी वापर करत भारताला हे यश मिळवून दिले.

न्यूझीलंडची अवस्था आता ७.४ षटकांत ४ बाद ५६ अशी अत्यंत बिकट झाली आहे. भारतीय खेळाडू मैदानावर अतिशय आत्मविश्वासात दिसत असून विजयाचे पाऊल अधिक जवळ आले आहे.

पॉवरप्ले संपला; न्यूझीलंडची ३ बाद ५२ धावांपर्यंत मजल, बुमराहचा भेदक स्पेल

टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पहिल्या ६ षटकांचा खेळ (पॉवरप्ले) संपला असून न्यूझीलंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात ५२ धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः जसप्रीत बुमराहने आपल्या अचूक माऱ्याने किवी फलंदाजांना जखडून ठेवले आहे.

बुमराहचा 'यॉर्कर' आणि 'स्लोअर' बॉलचा मारा

सहाव्या षटकात जसप्रीत बुमराहने केवळ ५ धावा दिल्या. त्याने टाकलेला एक 'पिनपॉईंट यॉर्कर' मार्क चॅपमनने कसाबसा अडवला, अन्यथा चेंडू थेट लेग स्टंपवर आदळला असता. बुमराहने आपल्या षटकात सातत्याने गतीमध्ये बदल (स्रोअर बॉल्स) करून फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले. चॅपमनचा एक हवेत उडालेला झेल टिळक वर्मापासून थोड्या अंतरावर पडल्याने तो थोडक्यात बचावला.

सध्या न्यूझीलंडसाठी टिम सायफर्ट १९ चेंडूंत ३५ धावा करून झुंज देत आहे, तर मार्क चॅपमन १ धावेवर खेळत आहे. भारताने सुरुवातीचे तीन महत्त्वाचे बळी घेतल्यामुळे सामन्यावर आपली पकड कायम ठेवली आहे.

भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने टी-२० विश्वचषक फायनलमध्ये आपल्या फिरकीने न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. डावातील पाचव्या षटकात अक्षरने ग्लेन फिलिप्सला (५ धावा) त्रिफळाचीत करून किवी संघाला तिसरा मोठा धक्का दिला.

अशी मिळाली विकेट:

अक्षरने टाकलेला 'स्लायडर' चेंडू फिलिप्सला अजिबात समजला नाही. त्याने सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू वेगाने खाली राहून थेट लेग स्टंपवर जाऊन धडकला. ग्लेन फिलिप्स बाद होताच मैदानात न्यूझीलंडच्या चाहत्यांमध्ये शांतता पसरली, तर अक्षरने हात उंचावून जल्लोष साजरा केला.

न्यूझीलंडची अवस्था आता ५ षटकांच्या आत ३ बाद २१ अशी अत्यंत नाजूक झाली असून, भारताने विजयाच्या दिशेने आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

बुमराहची 'एन्ट्री' अन् इशानचा चित्तथरारक झेल; रचिन रवींद्रही माघारी

न्यूझीलंडच्या डावातील चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच चेंडूवर भारताला दुसरे मोठे यश मिळवून दिले आहे. धोकादायक फलंदाज रचिन रवींद्र (१ धाव) बाद झाल्याने न्यूझीलंडची अवस्था आता २ बाद १४ अशी बिकट झाली आहे.

इशान किशनचे अफलातून क्षेत्ररक्षण:

बुमराहने टाकलेल्या लेग स्टंपवरील चेंडूवर रचिनने 'पिक-अप फ्लिक' मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या आतील कडेला लागून फाईन लेगच्या दिशेने हवेत उडाला. तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या इशान किशनने समोरच्या दिशेने वेगाने धावत जाऊन पूर्ण लांबीचा डायव्ह मारला आणि एक विलोभनीय झेल टिपला. जमिनीला कोपर लागल्याने चेंडू हाताबाहेर निसटला होता, मात्र इशानने हवेतच पुन्हा चेंडूवर ताबा मिळवून झेल पूर्ण केला.

बुमराहने या विकेटनंतर मैदानात धावत सुटून आपला खास जल्लोष साजरा केला, तर इशानच्या या चपळाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धोकादायक फिन ॲलन स्वस्तात बाद

२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आहे. फिरकीपटू अक्षर पटेलने डावातील तिसऱ्या षटकात किवी सलामीवीर फिन ॲलनला (९ धावा) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.

अशी मिळाली विकेट:

अक्षरने टाकलेला वेगवान चेंडू फिन ॲलनने 'स्लॉग पुल' करण्याच्या प्रयत्नात बॅटच्या आतील बाजूला घेतला. लाँग-ऑनवर उभ्या असलेल्या टिळक वर्माने कोणताही चुकीचा न करता सोपा झेल टिपला. विशेष म्हणजे, डावाच्या सुरुवातीलाच शिवम दुबेने फिन ॲलनचा झेल सोडला होता, मात्र अक्षरने त्याला मोठी खेळी करण्यापासून रोखले. ॲलन बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने अक्षरची गळाभेट घेत जल्लोष केला.

अहमदाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला आहे. विश्वचषक फायनलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली असून भारताने विजयासाठी किवींसमोर १२.७५ च्या सरासरीने धावांचे आव्हान ठेवले आहे.

संजू-अभिषेकचे 'वादळ' अन् इशानचा तडाखा

भारतीय डावाची सुरुवात एखाद्या वादळासारखी झाली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने पहिल्या ७ षटकांतच ९८ धावांची भागीदारी रचली.

अभिषेक शर्मा : २१ चेंडूंत ५२ धावा (६ चौकार, ३ षटकार).

संजू सॅमसन : सलग तिसरे अर्धशतक ठोकताना ४६ चेंडूंत ८९ धावांची खेळी केली. यात त्याने ८ गगनचुंबी षटकार खेचले.

इशान किशन : मधल्या फळीत इशाननेही हात साफ करत अवघ्या २५ चेंडूंत ५४ धावांची स्फोटक खेळी साकारली.

नीशमने रोखली धावगती; सूर्याला शून्यावर धाडले

भारताचा संघ ३०० धावांकडे कूच करत असताना जिमी नीशमने १५ व्या षटकात नाट्यमय गोलंदाजी केली. त्याने एकाच षटकात संजू सॅमसन (८९), इशान किशन (५४) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (०) या तिघांना बाद करून भारताची धावगती काहीशी रोखली. सूर्याला पहिल्याच चेंडूवर बाद करून नीशमने न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला.

शेवटच्या षटकांत शिवम दुबेचा 'फिनिशिंग' टच

डावाच्या अखेरीस हार्दिक पांड्या (१८) बाद झाल्यावर शिवम दुबेने मैदानावर येताच धमाका केला. त्याने अवघ्या ८ चेंडूंत २६ धावा कुटल्या (३ चौकार, २ षटकार). टिळक वर्मानेही त्याला नाबाद ८ धावांची साथ दिली. शेवटच्या २ षटकांत भारतीय फलंदाजांनी पुन्हा गिअर बदलल्याने भारताला २५० चा टप्पा ओलांडता आला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दयनीय अवस्था

न्यूझीलंडसाठी जिमी नीशमने ४६ धावांत ३ बळी घेतले, मात्र इतर गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. विशेषतः लॉकी फर्ग्युसनने केवळ २ षटकांत ४८ धावा मोजल्या. मॅट हेन्रीला ४ षटकांत ४९ धावा देऊन केवळ १ बळी मिळवता आला.

धावफलक थोडक्यात:

भारत: २० षटकांत २५५/५

मुख्य फलंदाज: संजू सॅमसन (८९), इशान किशन (५४), अभिषेक शर्मा (५२).

मुख्य गोलंदाज (NZ): जिमी नीशम (३/४६), रचिन रवींद्र (१/३२).

टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघ द्विशतकाकडे कूच करत असतानाच न्यूझीलंडच्या जिमी नीशमने डावातील १५ व्या षटकात सलग धक्के देत भारताची धावगती रोखली आहे. या एकाच षटकात भारताने तीन महत्त्वाचे गडी गमावले असून, यात कर्णधार सूर्यकुमार यादव 'गोल्डन डक' (पहिल्याच चेंडूवर शून्य) चा बळी ठरला आहे.

षटकातील नाट्यमय घडामोडी:

सूर्याची विकेट: पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला बाद केल्यानंतर, मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या खास शैलीत 'शॉर्ट-आर्म जॅब' मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर रचिन रवींद्रने धावत जाऊन एक अफलातून कमी उंचीचा झेल टिपला.

प्रेक्षकांमध्ये शांतता: सूर्या बाद होताच संपूर्ण स्टेडियममध्ये स्मशानशांतता पसरली. नीशमच्या या षटकात केवळ १ धाव आली आणि ३ बळी गेले.

नीशमचे पुनरागमन: न्यूझीलंडसाठी हे षटक एखाद्या संजीवनीसारखे ठरले आहे. संजू सॅमसन (८९) पाठोपाठ कर्णधाराला बाद करून नीशमने किवी संघाला सामन्यात थोड्या अंशी परत आणले आहे.

भारत अद्यापही भक्कम स्थितीत असला, तरी या षटकामुळे न्यूझीलंडच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. आता हार्दिक पांड्या किंवा रिंकू सिंग या जोडीवर शेवटच्या ५ षटकांत फटकेबाजी करण्याची मदार असेल.

सॅमसनचे ऐतिहासिक शतक हुकले

टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात आपल्या बॅटने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची दाणादाण उडवणाऱ्या संजू सॅमसनचा प्रवास अखेर १५.१ षटकात थांबला. शतकाकडे कूच करत असलेला संजू ८९ धावांवर बाद झाला असून, संपूर्ण मैदानातील प्रेक्षकांनी आणि भारतीय डगआउटमधील खेळाडूंनी उभे राहून त्याला मानवंदना दिली.

जिमी नीशमने टाकलेल्या १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू 'लो फुल-टॉस' होता. लाँग-ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या बदली खेळाडू कोल मॅककॉन्चीने आपल्या डाव्या बाजूला धावत जात एक उत्कृष्ट झेल टिपला. पंचांनी चेंडूच्या उंचीबाबत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली, मात्र चेंडू कायदेशीर ठरल्याने संजूला माघारी परतावे लागले.

संजूची स्फोटक खेळी

  • धावा : ८९ (४६ चेंडू)

  • चौकार/षटकार: ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकार

बाद झाल्यानंतर इशान किशन प्रचंड निराश दिसला, मात्र संजूने त्याला धीर देत मैदानातून निरोप घेतला. सलग तीन बाद फेरीच्या सामन्यांत संजूने भारतासाठी 'मॅच-विनिंग' खेळी साकारली आहे. संजूचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले असले, तरी त्याने भारताला २०० हून अधिक धावांच्या विशाल धावसंख्येकडे नेऊन ठेवले आहे.

अहमदाबादमध्ये संजू सॅमसनचे 'षटकार' तांडव

टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम सामन्यात संजू सॅमसनने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आहेत. डावातील १४ व्या षटकात रचिन रवींद्रला लक्ष्य करत संजूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग ३ खणखणीत षटकार खेचले. या तुफानी फटकेबाजीमुळे भारताने १४ षटकांत १ बाद १९१ धावा कुटल्या असून संघ द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

संजू सॅमसनने रचले नवे विक्रम:

सर्वाधिक षटकार: एकाच टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम आता संजूच्या नावावर जमा झाला आहे. त्याने या स्पर्धेत २१ षटकार मारून न्यूझीलंडच्या फिन ॲलनचा (२० षटकार) विक्रम मोडीत काढला.

भारताचे शतक: संजूने मारलेल्या एका षटकारासह या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १०० षटकार पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला.

मैदानात चौफेर फटकेबाजी:

रचिन रवींद्रने सुरुवातीचे तीन चेंडू टिच्चून टाकले होते, मात्र शेवटच्या तीन चेंडूंवर संजूने आपला गिअर बदलला. पहिल्यांदा 'स्लॉट' मध्ये आलेला चेंडू साईटस्क्रीनच्या पलीकडे धाडला, त्यानंतर शॉर्ट बॉलवर 'बॅकफूट पुल' मारत षटकार वसूल केला आणि शेवटच्या चेंडूवर लाँग-ऑफच्या वरून षटकार मारून षटकाची सांगता केली.

सध्या संजू सॅमसन ८८ (४४ चेंडू) आणि इशान किशन ४३ (१९ चेंडू) धावांवर खेळत आहेत. संजू आता आपल्या पहिल्या विश्वचषक शतकापासून अवघ्या १२ धावा दूर आहे.

भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाचे अक्षरशः धिंडवडे काढले. डावातील १२ व्या षटकात संजू सॅमसन आणि इशान किशन या जोडीने लॉकी फर्ग्युसनला लक्ष्य करत तब्बल २४ धावा वसूल केल्या. यासह भारताने १२ षटकांत १ बाद १६१ धावा कुटल्या असून सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

संजू सॅमसनचे जागतिक विक्रमात स्थान

या अर्धशतकी खेळीसह संजू सॅमसनने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. एकाच विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यांत ५० हून अधिक धावा करणारा तो विराट कोहली (२०१४) आणि शाहिद आफ्रिदी (२००९) यांच्यानंतरचा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच, सलग तीन सामन्यांत ५० हून अधिक धावा करण्याचा पराक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.

फर्ग्युसनसाठी 'दुस्वप्न' ठरणारे षटक

न्यूझीलंडचा सर्वात वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनसाठी हा सामना एखाद्या दुस्वप्नासारखा ठरला आहे. त्याने टाकलेल्या या षटकात:

संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, तर दुसऱ्या चेंडूवरही चेंडू थेट 'साईटस्क्रीन'च्या बाहेर धाडला.

इशान किशननेही हात साफ करत चौथ्या चेंडूवर एक फ्लॅट षटकार लगावला.

षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संजूने मि़ड-ऑफच्या वरून चौकार मारून षटकाचा समारोप केला.

लॉकी फर्ग्युसनने आतापर्यंत टाकलेल्या केवळ १० चेंडूंमध्ये तब्बल ४३ धावा मोजल्या आहेत. सध्या संजू सॅमसन ६७ (३७ चेंडू), तर इशान किशन ३४ (१४ चेंडू) धावांवर खेळत असून भारत २०० हून अधिक धावांच्या विशाल धावसंख्येकडे कूच करत आहे.

सॅमसनचा 'हॅटट्रिक' धमाका

भारतीय यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे. मिचेल सँटनरच्या चेंडूवर एक धाव घेत संजूने हा टप्पा गाठला. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील संजूचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले आहे.

संजूच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने डगआउटमधून उभे राहून त्याचे कौतुक केले, तर साथीदार फलंदाज इशान किशनने मैदानातच त्याला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. मैदानातील हजारो प्रेक्षकांनी संजूचे उभे राहून स्वागत केले. या 'विराट' पुनरागमनानंतर संजू केवळ अर्धशतकावर समाधान न मानता मोठी खेळी करण्याच्या निर्धाराने खेळताना दिसत आहे.

१० षटकाअखेर भारत १२७/१

टी-२० विश्वचषक फायनलच्या पहिल्या १० षटकांत भारतीय संघाने १ बाद १२७ धावा कुटून सामन्यावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. न्यूझीलंडने मधल्या षटकांत धावांचा वेग रोखण्याचा प्रयत्न केला असला, तरी जिमी नीशमच्या डावातील १० व्या षटकात भारताने १२ धावा वसूल केल्या.

संजू-इशानचा हल्ला

जिमी नीशमने टाकलेल्या १० व्या षटकात संजू सॅमसनने आपल्या कल्पक फलंदाजीचे दर्शन घडवले. ९.२ षटकात नीशमने टाकलेला यॉर्कर चेंडू सॅमसनने अत्यंत चपळाईने 'स्क्वीझ' करत यष्टीरक्षक आणि 'शॉर्ट थर्ड मॅन'च्या मधून चौकार मिळवला. त्यानंतर इशान किशननेही नीशमच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला 'बॅकवर्ड पॉईंट'च्या दिशेने टोलावून चौकार वसूल केला.

सध्या संजू सॅमसन ४८ धावांवर (३० चेंडू) खेळत असून तो आपल्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावा दूर आहे. तर दुसऱ्या बाजूला इशान किशनने ९ चेंडूंत १९ धावा फटकावत संजूला उत्तम साथ दिली आहे. न्यूझीलंडने मधल्या काही षटकांत धावगती कमी केली असली, तरी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा गिअर बदलण्याचे संकेत दिले आहेत.

इशान किशनचा मैदानात येताच धमाका

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतरही भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडवरचा दबाव कमी होऊ दिलेला नाही. डावातील ८ व्या षटकात भारताने १ गडी गमावून ११० धावा फलकावर लावल्या आहेत.

अभिषेकच्या वादळी खेळीचा अंत

षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रने भारताला मोठा धक्का दिला. अर्धशतकवीर अभिषेक शर्मा (५२ धावा) चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आपला तोल गमावून बसला आणि यष्टिरक्षक टिम सायफर्टकडे झेल देऊन बाद झाला. बाद झाल्यानंतर अभिषेकने निराशेत आपल्या बॅटवर थाप मारली, मात्र त्याने दिलेल्या आक्रमक सुरुवातीमुळे प्रेक्षकांनी उभे राहून त्याला दाद दिली.

इशानची 'एन्ट्री' आणि चौकारांची आतषबाजी

अभिषेकच्या जागी मैदानात आलेल्या इशान किशनने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने रचिन रवींद्रच्या याच षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. पाचव्या चेंडूवर मिड-विकेटच्या दिशेने फ्लिक करून, तर शेवटच्या चेंडूवर अत्यंत चपळाईने 'लेट कट' मारून त्याने चेंडू सीमापार धाडला.

सध्या संजू सॅमसन ३८ (२२ चेंडू) आणि इशान किशन १२ (५ चेंडू) धावांवर खेळत आहेत. भारताची धावगती पाहता न्यूझीलंडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

अभिषेक शर्माची वादळी खेळी संपुष्टात, रचिनने मिळवला बळी

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ज्या मोठ्या विकेटची प्रतीक्षा होती, ती अखेर ७.१ षटकात रचिन रवींद्रने मिळवून दिली. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा ५२ धावा करून बाद झाला आहे.

असा झाला बाद

रचिन रवींद्रने ऑफ-स्टंपच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू खेळण्याच्या नादात अभिषेकचा तोल गेला. चेंडू बॅटची हलकी कड घेऊन यष्टिरक्षक टिम सायफर्टच्या हातात विसावला. यष्टीरक्षकाने चेंडू झेलताच जोरदार अपील केले आणि पंच ॲलेक्स वॉर्फ यांनी कोणताही विलंब न लावता बाद घोषित केले. अभिषेकने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले.

अभिषेकने अवघ्या २१ चेंडूंत ५२ धावांची तुफानी खेळी करून भारताला मजबूत पाया रचून दिला आहे. बाद झाल्यानंतर स्वतःच्याच चुकीमुळे अभिषेक प्रचंड निराश दिसला. मात्र, या 'नशिबाच्या' विकेटमुळे न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करण्याची थोडी संधी मिळाली आहे.

अहमदाबादमध्ये भारताचे ऐतिहासिक 'पॉवरप्ले' वादळ

६ षटकांत ९२ धावा कुटून न्यूझीलंडला बॅकफूटवर धाडले!

टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम सामन्यात भारतीय सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसे काढत जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्या दोन षटकांत केवळ १२ धावा केल्यानंतर, भारतीय फलंदाजांनी पुढच्या चार षटकांत हल्ला चढवला आणि तब्बल ८० धावा वसूल केल्या. पॉवरप्लेच्या ६ षटकाअखेर भारताने बिनबाद ९२ धावा फलकावर लावल्या.

पॉवरप्लेमधील ऐतिहासिक कामगिरी

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही संयुक्तपणे सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्ध ९२ धावा केल्या होत्या, मात्र अंतिम सामन्यात असा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.

पॉवरप्लेचे मुख्य आकर्षण

अभिषेक शर्माचे तुफान : अभिषेकने अवघ्या १८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण करून टीकाकारांची तोंडे बंद केली.

गोलंदाजांची दाणादाण: किवी वेगवान गोलंदाजांनी दडपणाखाली अनेक 'वाईड' चेंडू टाकले, ज्याचा पुरेपूर फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला.

रवी शास्त्रींची टिप्पणी : समालोचन करताना रवी शास्त्री गमतीने म्हणाले, ‘‘न्यूझीलंडला आता 'ड्रिंक्स'ची नितांत गरज आहे,’’ जे किवी संघाची मैदानावरील दयनीय अवस्था दर्शवते.

सुरवातीच्या दोन षटकांत संथ वाटणारा हा सामना तिसऱ्या षटकापासून पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. भारतीय सलामीवीरांच्या या 'कार्नेज'मुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे दिशाहीन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय संघाचा नवा जागतिक विक्रम; टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील 'फास्टेस्ट ५०'

टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीरांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडत एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. भारताने अवघ्या ४ षटकांत (२४ चेंडूंत) आपल्या ५० धावा पूर्ण केल्या.

टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीतील (उपांत्य किंवा अंतिम सामना) हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान सांघिक अर्धशतक ठरले आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे भारताने हा पराक्रम केला असून, न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे वाभाडे काढत सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळवले आहे.

अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. स्पर्धेत आतापर्यंत अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या अभिषेकने सर्वात महत्त्वाच्या दिवशी आपली बॅट तळपवली आहे.

जेकब डफीच्या षटकात चौकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अशा प्रकारची आक्रमक खेळी साकारून त्याने भारताला अतिशय भक्कम स्थितीत नेऊन ठेवले आहे. अभिषेकच्या या खेळीमुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्याने आपल्या टीकाकारांना मैदानातूनच चोख प्रत्युत्तर दिले आहे.

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. मॅट हेन्रीने टाकलेल्या डावातील पाचव्या षटकात भारतीय सलामीवीरांनी तब्बल २१ धावा कुटल्या. यासह भारताने ५ षटकांत बिनबाद ७२ धावा करत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली आहे.

ऐतिहासिक सलामीची भागीदारी

या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या गड्यासाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी करून नवा इतिहास रचला आहे. पुरुष टी-२० विश्वचषक फायनलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली आहे. यापूर्वी २००९ मध्ये पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि शाहझैब हसन यांनी श्रीलंकेविरुद्ध नोंदवलेला ४८ धावांचा विक्रम आज मोडीत निघाला.

हेन्रीच्या 'स्लोअर बॉल्स'वर अभिषेक-संजूचा प्रहार

पॉवरप्लेमध्येच किवी गोलंदाज दबावाखाली आल्याचे पाहायला मिळाले. मॅट हेन्रीने 'कटर्स' आणि 'स्लोअर बॉल्स' टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र अभिषेक आणि संजूने त्याचा समाचार घेतला. अभिषेक शर्माने ४.३ षटकांत लाँग-ऑफच्या वरून एक उत्तुंग षटकार मारला, तर संजू सॅमसनने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत षटकाचा समारोप केला. हेन्रीने या षटकात वारंवार 'वाईड' चेंडू टाकल्याने न्यूझीलंडच्या अडचणीत अधिक भर पडली.

सध्या संजू सॅमसन ३३, तर अभिषेक शर्मा ३१ धावांवर खेळत असून भारताची धावसंख्या २२० च्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फर्ग्युसनच्या एकाच षटकात भारताने कुटल्या २४ धावा

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीरांनी रौद्र रूप धारण केले आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या पहिल्याच षटकाचा समाचार घेत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने तब्बल २४ धावा वसूल केल्या. या तुफानी फटकेबाजीमुळे भारताने अवघ्या ४ षटकांत बिनबाद ५१ धावांचा टप्पा ओलांडला आहे.

फर्ग्युसनच्या वेगाचा भारताला फायदा

लॉकी फर्ग्युसनचा वेग आज त्याच्यासाठीच घातक ठरला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्माने आक्रमक पवित्र घेत चौकार मारला, तर दुसऱ्या चेंडूवर त्याने 'स्लॉट' मध्ये आलेल्या चेंडूला लाँग-ऑफच्या वरून षटकार खेचला. फर्ग्युसनने दबावाखाली येऊन सलग वाईड चेंडू टाकल्याने न्यूझीलंडच्या अडचणीत भर पडली.

सॅमसनचा नशिबाचा आणि कौशल्याचा फटका

संजू सॅमसननेही या षटकात आपला हात साफ करून घेतला. एका उसळत्या चेंडूवर सॅमसनच्या बॅटची कड लागून चेंडू थर्ड मॅनच्या वरून षटकारासाठी गेला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅमसनने चपळाईने चेंडू 'फाईन लेग'च्या दिशेने वळवत चौकार मिळवला आणि ४ षटकांत भारताचे अर्धशतक पूर्ण केले.

सध्या संजू सॅमसन १४ चेंडूंत २४ धावांवर, तर अभिषेक शर्मा १० चेंडूंत २३ धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडने फिरकीपटूंऐवजी वेगवान गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास आतापर्यंत तरी भारतीय फलंदाजांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.

जेकब डफीचे महागडे षटक; अभिषेक आणि संजूचा चौफेर हल्ला

संथ सुरुवातीनंतर भारतीय सलामीवीरांनी तिसऱ्या षटकात आपला गिअर बदलला. न्यूझीलंडचा नवा गोलंदाज जेकब डफी याच्या पहिल्याच षटकात १५ धावा वसूल केल्या आहेत. यासह भारताने ३ षटकांत बिनबाद २७ धावांपर्यंत मजल मारली आहे.

अभिषेक शर्माचा आक्रमक पवित्रा

डावखुऱ्या अभिषेक शर्माने या षटकात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. डफीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने 'डाऊन द ट्रॅक' येत मिड-ऑनच्या डोक्यावरून चौकार वसूल केला. त्यानंतरच्या चेंडूवरही त्याने मिड-ऑफच्या वरून चेंडू सीमापार धाडला. डफीच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारताना अभिषेक एकदा बचावला, जेव्हा त्याचा झेल 'डीप स्क्वेअर लेग'वर क्षेत्ररक्षकाच्या थोडा आधी पडला.

संजू सॅमसनचा शेवटचा तडाखा

षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संजू सॅमसनने डफीला 'लॉफ्टेड शॉट' मारत चौकार मिळवला आणि या षटकाचा शेवट गोड केला. डफीने या षटकात एक वाईड चेंडू आणि तीन चौकारांसह १५ धावा मोजल्या. न्यूझीलंडने आपल्या मुख्य फिरकीपटूला वगळण्याचा घेतलेला निर्णय भारतीय सलामीवीरांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे, कारण अभिषेक शर्मा आता पेसर्सवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे.

दुसऱ्या षटकात फिरकीचे आगमन; अभिषेक शर्माने संयमी सुरुवातीनंतर उघडले खाते

न्यूझीलंडने आपल्या रणनीतीनुसार दुसऱ्याच षटकात फिरकी गोलंदाज ग्लेन फिलिप्सला पाचारण केले. अभिषेक शर्माची ऑफ-स्पिनविरुद्धची कमजोरी लक्षात घेता किवी संघाने हा डाव टाकला, मात्र भारतीय फलंदाजांनी हे षटक सावधपणे खेळून काढले.

ग्लेन फिलिप्सच्या या षटकात भारताने ५ धावा वसूल केल्या. सॅमसनने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत अभिषेक शर्माला स्ट्राईक दिली. अभिषेकने सुरुवातीचे दोन चेंडू अत्यंत सावधगिरीने खेळले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेत त्याने आपले खाते उघडले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेकने कव्हर्सच्या दिशेने एक सुरेख फटका मारला होता, मात्र डॅरिल मिचेलने लाँग-ऑफवर उत्कृष्ट डायव्ह मारत निश्चित दिसणारा चौकार अडवला.

दोन षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या बिनबाद १२ धावा अशी आहे. संजू सॅमसन ९, तर अभिषेक शर्मा ३ धावांवर खेळत आहे. सुरुवातीच्या दोन षटकांत खेळपट्टीवरून गोलंदाजांना फारशी मदत मिळताना दिसत नसल्याने, पॉवरप्लेच्या उर्वरित षटकांत भारत आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

पहिले षटक

न्यूझीलंडविरुद्धच्या महाअंतिम सामन्यात भारताने सावध पण आक्रमक सुरुवात केली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी मैदानात उतरली.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने टाकलेल्या पहिल्याच षटकात संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेन्रीने सॅमसनला आपल्या 'स्विंग'ने चकवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या चेंडूवर पायचीतचे जोरदार अपील झाले. मात्र, 'अल्ट्रा-एज'मध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले.

सॅमसनने पाचव्या चेंडूवर हेन्रीला खणखणीत षटकार खेचत आपले खाते उघडले. एका 'लेंथ बॉल'वर सॅमसनने मारलेला हा 'फ्लॅट' षटकार प्रेक्षणीय होता. पहिल्या षटकाअखेर भारताने बिनबाद ७ धावा केल्या आहेत. सॅमसन ७ धावांवर खेळत असून अभिषेक शर्माने अद्याप स्ट्राईक घेतलेली नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याने भारत मोठी धावसंख्या उभारण्यास सज्ज दिसत आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी आपल्या धोरणात्मक निर्णयांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दोन्ही संघांची 'प्लेइंग इलेव्हन'

भारतीय संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड संघ : टिम सायफर्ट (यष्टिरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी.

न्यूझीलंडची धक्कादायक रणनीती

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, न्यूझीलंडने या सामन्यात 'स्पेशालिस्ट' ऑफ-स्पिनरला संधी दिलेली नाही. अभिषेक शर्मा आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांसाठी ऑफ-स्पिन गोलंदाजी डोकेदुखी ठरू शकली असती. आता किवी संघ पॉवरप्लेमध्ये ग्लेन फिलिप्सकडून गोलंदाजी करून घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काय म्हणाले कर्णधार?

सूर्यकुमार यादव : "आम्हाला प्रथम फलंदाजी करताना आनंदच होत आहे, कारण गेल्या काही सामन्यांत आम्ही यात चांगली कामगिरी केली आहे. उपांत्य किंवा अंतिम फेरीसारख्या मोठ्या सामन्यात धावफलकावर धावा असणे केव्हाही चांगलेच असते. मागील इतिहास आता मागे पडला असून, या नवीन विश्वचषकाच्या फायनलसाठी आम्ही कमालीचे उत्सुक आहोत. स्टेडियम आत्ताच पूर्ण भरलेले दिसत आहे, प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून आम्हाला उत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळत आहे. आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही."

मिचेल सँटनर : "आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी उत्तम दिसत असून सुरुवातीला गोलंदाजांना काही मदत मिळते का, हे आम्ही पाहू. भारताला एका माफक धावसंख्येवर रोखून ते आव्हान गाठण्याचा आमचा मानस आहे. सर्व खेळाडू फॉर्मात असून अशाच मोठ्या प्रसंगांसाठी आम्ही कठोर सराव करतो. आजच्या सामन्यात मॅककॉन्ची ऐवजी जेकब डफीला संधी देण्यात आली आहे."

गंभीरचा अभिषेक-वरुणवर विश्वास कायम; अंतिम सामन्यात दोघांना शेवटची संधी?

भारतीय संघाची या विश्वचषकातील यशस्वी घोडदौड केवळ ठळक बातम्यांमध्ये झळकणाऱ्या खेळाडूंवरच अवलंबून नाही. इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्या धावांचा पाऊस किंवा वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांचे भेदक स्पेल यां पलीकडेही काही अशा खेळाडूंचे योगदान आहे, ज्यांनी शांतपणे संघाचा समतोल राखला आहे.

तिलक वर्मा हे अशाच खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी १५५.४६ च्या स्ट्राईक रेटने १९९ धावा केल्या आहेत. जरी ही आकडेवारी चार्टमध्ये अव्वल नसली, तरी प्रसिद्धीच्या झोतात न राहता भारतीय डावाचा वेग कायम राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली आहे. हार्दिक पंड्या देखील संघासाठी तितकाच मोलाचा ठरला आहे; त्याने १६३.११ च्या सरासरीने १९९ धावा कुटल्या असून ८ बळीही टिपले आहेत.

याशिवाय अक्षर पटेलच्या कामगिरीचीही दखल घेणे आवश्यक आहे. ८ बळी आणि गोलंदाजीतील सातत्यपूर्ण ओव्हरलोड यामुळे त्याने भारतीय आक्रमणाची कणा म्हणून भूमिका निभावली आहे. तसेच शिवम दुबे याने १५९.५४ च्या स्ट्राईक रेटने २०९ धावा फटकावत मधल्या फळीला मोठी ताकद दिली आहे.

चर्चा करताना सहसा या खेळाडूंची नावे प्रथम येत नाहीत. मात्र, अंतिम सामन्यासारख्या मोठ्या लढतीत 'एक्स-फॅक्टर्स' तेच खेळाडू ठरतात जे संघाला अधिक प्रगल्भ, सखोल आणि अभेद्य बनवतात. भारतीय संघात अशा खेळाडूंची फळी सज्ज आहे.

गौतम गंभीर रचणार नवा इतिहास

भारतीय क्रिकेट संघाने आगामी अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावल्यास, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नावावर एका अनोख्या आणि ऐतिहासिक विक्रमाची नोंद होणार आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून भारताने जेतेपद पटकावले होते. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा गौतम गंभीर अविभाज्य भाग होते.

त्या ऐतिहासिक विजयात गंभीर यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले होते. त्यांनी ५४ चेंडूंत ७५ धावांची झुंजार खेळी साकारून भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता तब्बल १९ वर्षांनंतर, त्यांच्याकडे एक खेळाडू आणि त्यानंतर एक प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांतून टी-२० विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

जर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद काबीज केले, तर खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही नात्याने विश्वचषक जिंकणारे गंभीर हे जगातील पहिलेच व्यक्ती ठरतील. त्याचबरोबर, भारतीय संघदेखील सलग दुसरे आणि एकूण तिसरे टी-२० विश्वविजेतेपद पटकावून इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे. असा पराक्रम करणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरेल.

टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर प्लेइंग इलेवन निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंची तुलना करता त्यांचे व्हेरिएशन्स अधिक प्रभावी ठरत आहेत, अशा स्थितीत फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करणे भारतासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळेच वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, यावर खल सुरू आहे.

वरुणची 'मिस्ट्री' संपली?

वरुण चक्रवर्तीने आपली ओळख एक 'मिस्ट्री स्पिनर' म्हणून निर्माण केली आहे. त्याच्या लेग स्पिनला चकवणे फलंदाजांसाठी नेहमीच कठीण राहिले असून, याच जोरावर त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवले आहे. सध्या तो टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्याच्या उपस्थितीमुळे कुलदीप यादवसारख्या अनुभवी गोलंदाजाला बेंचवर बसावे लागत आहे. मात्र, विश्वचषकाच्या उत्तरार्धात प्रतिस्पर्धी फलंदाजांनी वरुणच्या 'मिस्ट्री'चा तोड शोधल्याचे चित्र दिसत आहे. वरुणने या स्पर्धेत ८ सामन्यांत १३ बळी घेतले असले, तरी गेल्या काही सामन्यांत तो महागडा ठरला आहे.

दुबळ्या संघांविरुद्ध चमक, पण बाद फेरीत अपयश

ग्रुप स्टेजमध्ये वरुणने चार सामन्यांत ९ बळी मिळवत दबदबा निर्माण केला होता, मात्र सुपर-८ मध्ये पोहोचताच त्याची जादू ओसरल्याचे दिसते. प्रतिस्पर्धी फलंदाज आता त्याची गोलंदाजी सहजपणे वाचत असून मोठे फटके मारत आहेत. इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना तर वरुणसाठी विसरण्याजोगा ठरला; त्याने ४ षटकांत ६४ धावा मोजून केवळ एक बळी घेतला. त्याच्या या खराब कामगिरीमुळे भारत अडचणीत आला होता, पण जसप्रीत बुमराहने (४ षटकांत ३३ धावा) परिस्थिती सावरून धरली.

कर्णधार सूर्याचा वरुणवर विश्वास

वरुण सलग चार सामन्यांत निष्प्रभ ठरला असला तरी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्यावर विश्वास कायम ठेवण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या मधल्या फळीला रोखण्यासाठी वरुणची शैली उपयुक्त ठरू शकते, असे व्यवस्थापनाचे मत आहे. शिवाय, अंतिम सामन्यासारख्या मोठ्या दडपणाच्या वेळी सहसा 'विजेत्या संघात' बदल करणे टाळले जाते.

कुलदीप यादव: अनुभवाचा हुकमी एक्का

दुसरीकडे, कुलदीप यादव हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम 'रिस्ट स्पिनर' मानला जातो. मोठ्या सामन्यांचा अनुभव आणि स्वबळावर सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या विश्वचषकात त्याने केवळ पाकिस्तानविरुद्ध एक सामना खेळला, ज्यात त्याने ३ षटकांत १४ धावा देत १ बळी घेतला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कुलदीपचा विक्रम उत्कृष्ट असून, येथील मोठ्या सीमारेषांचा फायदा घेत तो आपल्या फ्लाईट आणि टर्नने फलंदाजांना जाळ्यात ओढू शकतो.

अभिषेक शर्माच्या कामगिरीवरही नजर

संघातील दुसरा चिंतेचा विषय म्हणजे अभिषेक शर्मा. त्याला या स्पर्धेत पुरेशी संधी मिळाली, मात्र एका अर्धशतकाचा अपवाद वगळता तो अपयशी ठरला आहे. ऑफ स्पिनविरुद्धची त्याची कमजोरी उघड झाली असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर तो एकाच पद्धतीने बाद होताना दिसत आहे. असे असूनही, अंतिम सामन्यात टीम मॅनेजमेंट त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्याची चिन्हे आहेत.

न्यूझीलंड संघात नो बदल?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. टिम सायफर्ट आणि फिन ॲलन फॉर्मात परतले असून त्यांच्याकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा उत्तम समतोल आहे. त्यामुळे किवी संघ विनाबदल मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही संघांच्या फिरकी आक्रमणाची तुलना केली असता न्यूझीलंडचे पारडे जड वाटते, त्यामुळे भारताला खेळपट्टी आणि संघ निवड करताना अत्यंत सावध राहावे लागणार आहे.

न्यूझीलंडच्या 'या' 5 खेळाडूंचा टीम इंडियाला धोका

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जेतेपदासाठी अटीतटीची लढत अपेक्षित आहे. भारतीय संघ फॉर्मात असला तरी, किवी संघातील काही खेळाडू त्यांच्या अफाट क्षमतेमुळे भारताचे 'विश्वविजेते' होण्याचे स्वप्न उधळून लावू शकतात. अंतिम सामन्यात भारतासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंवर एक नजर..

१. फिन ॲलन (स्फोटक सलामीवीर)

न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन या विश्वचषकातील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून उदयास आला आहे. त्याने आतापर्यंत सात डावांत २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने २८९ धावा कुटल्या आहेत. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूंत शतक झळकावून त्याने इतिहास रचला. पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडणे ही ॲलनची खासियत आहे. भारतीय गोलंदाजांना त्याला पॉवरप्लेमध्येच बाद करावे लागेल, अन्यथा तो सामन्याची दिशा सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या बाजूने झुकवू शकतो.

२. ग्लेन फिलिप्स (बहुआयामी अष्टपैलू)

ग्लेन फिलिप्स हा न्यूझीलंडचा सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडू आहे. या स्पर्धेत त्याने मध्यक्रमात वेगवान धावा जोडल्या आहेत आणि गरजेच्या वेळी आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने महत्त्वपूर्ण बळीही टिपले आहेत. याव्यतिरिक्त, फिलिप्सची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. त्याचे चपळ क्षेत्ररक्षण १०-१५ धावा वाचवून सामन्याचा नूर पालटू शकते.

३. मॅट हेनरी (स्विंगचा हुकमी एक्का)

वेगवान गोलंदाज मॅट हेनरी न्यूझीलंडचा प्रमुख विकेट घेणारा गोलंदाज आहे. या विश्वचषकात त्याने सात सामन्यांत ९ बळी घेत नवीन चेंडूने फलंदाजांना सातत्याने अडचणीत टाकले आहे. त्याची स्विंग गोलंदाजी भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांसाठी, विशेषतः पॉवरप्लेमध्ये, धोक्याची घंटा ठरू शकते.

४. रचिन रवींद्र (युवा फिरकीपटू)

न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने या विश्वचषकात गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने ८ सामन्यांत ११ बळी घेतले असून अनेक प्रसंगी संघाला महत्त्वपूर्ण यश (ब्रेकथ्रू) मिळवून दिले आहे. रवींद्र उपयुक्त फलंदाजीही करू शकतो आणि भारतीय खेळपट्ट्यांवर त्याची फिरकी गोलंदाजी काफी प्रभावी ठरू शकते.

५. मिचेल सँटनर (अनुभवी कर्णधार)

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर अंतिम सामन्यात मोठी भूमिका बजावू शकतो. तो आपल्या अचूक फिरकी गोलंदाजीसह खालच्या क्रमांकावर वेगवान धावा काढण्याची क्षमता ठेवतो. नुकतेच श्रीलंकेविरुद्ध त्याने २६ चेंडूंत ४७ धावांची खेळी करून संघाला संकटातून बाहेर काढले होते. अहमदाबादची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असू शकते, त्यामुळे सँटनर भारतीय फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

सामना नेमका किती वाजता सुरू होणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. ८) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी एका भव्य सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना नेमका किती वाजता सुरू होईल याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

भारतीय संघावर जेतेपद राखण्याचे दडपण

अत्यंत प्रतिभावान आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघावर रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची मोठी जबाबदारी असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे पारडे जड मानले जात असले, तरी 'फायनल'च्या लढतीचा दबाव वेगळा असतो. त्यातच न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत ज्या प्रकारे विजय मिळवला, तो पाहता त्यांना कमी लेखून चालणार नाही.

अहमदाबादमधील त्या जखमा अजूनही ओल्या

१९ नोव्हेंबर २०२३ रोजी जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताला मोठा धक्का बसला होता. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह अवघा देश हळहळला होता. केवळ खेळाडूच नव्हे, तर स्टेडियममधील ९३,००० प्रेक्षकही स्तब्ध झाले होते. मात्र, २०२४ मध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकून ती कसर भरून काढली. आता सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी आणि टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा जगातील पहिला संघ ठरण्यासाठी मैदानात उतरेल.

सामन्यापूर्वी रंगणार दिमाखदार सांगता समारंभ

अहमदाबादमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने एका भव्य सांगता समारंभाचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय गायक रिकी मार्टिन, 'भांगडा किंग' सुखबीर आणि प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आपल्या सुरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

वेळेचे नियोजन :

  • स्टेडियमचे दरवाजे दुपारी ३:३० वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी खुले होतील.

  • सांगता समारंभ : सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल.

  • सामन्याची वेळ : सांगता समारंभ सामन्याच्या दीड तास आधी होणार असल्याने, नियोजित वेळेनुसारच सामन्याला सुरुवात होईल. सांगता समारंभामुळे सामन्याला कोणताही उशीर होणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

  • अंतिम सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. त्याआधी, सायंकाळी ६:३० वाजता टॉस होईल.

  • थेट प्रक्षेपण : टी-२० विश्वचषकाचे अधिकृत प्रक्षेपण हक्क 'स्टार स्पोर्ट्स'कडे आहेत, त्यामुळे प्रेक्षक हा सामना 'स्टार स्पोर्ट्स'च्या विविध वाहिन्यांवर पाहू शकतात. याव्यतिरिक्त, 'जिओहॉटस्टार' (JioHotstar) ॲपवर या सामन्याचे थेट प्रवाह (Live Streaming) उपलब्ध असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news