

MS Dhoni Injury Update
चेन्नई: आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या मते, जोपर्यंत चेन्नईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडत नाही, तोपर्यंत धोनी मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. धोनी सध्या दुखापतीशी झुंजत असून संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे अश्विनने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी संमिश्र राहिली आहे. ८ सामन्यांपैकी केवळ ३ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे. धोनीच्या पुनरागमनाबाबत बोलताना अश्विन आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, "जर चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला, तरच धोनी खेळताना दिसू शकतो. सध्या चेन्नई अजूनही प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहे, मग संघ व्यवस्थापन आताच धोका का पत्करेल? गेल्या ५ सामन्यांतील कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. गोलंदाजी फॉर्मात आहे आणि फलंदाजांनी साथ दिली, तर चेन्नई सलग तीन सामने जिंकून पुनरागमन करू शकते."
हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनी 'काफ इंजरी' (पिंढरीची दुखापत) मुळे त्रस्त आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही धोनीची दुखापत गंभीर असल्याचे मान्य केले आहे. सराव सामन्यादरम्यान ही दुखापत पुन्हा उफाळून आल्याने धोनीला सावरण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. "धोनी फिजिओच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रयत्न करत आहे, पण आम्ही त्याला घाईघाईत मैदानात उतरवून संपूर्ण हंगामासाठी मुकण्याची जोखीम घेऊ शकत नाही," असे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.
अश्विनच्या मते, चेन्नईसाठी आता आगामी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. विशेषतः मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. चेन्नईला उर्वरित ६ पैकी किमान ४ सामने जिंकणे आवश्यक आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये परतला असून आगामी सामने फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्यांवर होणार आहेत.