

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात आनंदाचे वातावरण असले, तरी कर्णधार ऋतुराज गायकवाडचा फॉर्म हा चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन याने ऋतुराजची पाठराखण केली आहे. ऋतुराजवर टीका करणाऱ्यांना आरसा दाखवताना अश्विनने चक्क महेंद्रसिंग धोनीचे उदाहरण दिले असून, खराब फॉर्ममध्ये खेळाडूला साथ देणे हेच संघ व्यवस्थापनाचे आद्य कर्तव्य असल्याचे म्हटले आहे.
अश्विनने चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला सावध करताना स्पष्ट केले की, जगातील महान खेळाडूही कधी ना कधी खराब फॉर्मचा सामना करतात. अश्विन म्हणाला, "महेंद्रसिंग धोनीसारखा दिग्गज खेळाडू तरी कुठे प्रत्येक सामन्यात धावा करतो? प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा कठीण काळ येतो. अशा वेळी कर्णधाराला किंवा खेळाडूला वाऱ्यावर सोडणे ही सर्वात मोठी चूक ठरेल."
ऋतुराजच्या फलंदाजीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना अश्विनने ठामपणे सांगितले की, सलग दोन विजयांनंतर संघाने अधिक स्थैर्य दाखवणे गरजेचे आहे. घाईघाईत बदल करणे संघाच्या हिताचे नसल्याचेही त्याने नमूद केले.
चालू हंगामातील पाच सामन्यांत ऋतुराजला केवळ ६३ धावा करता आल्या आहेत, ज्यात २८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या अपयशामुळे सोशल मीडियावर तरुण खेळाडू आयुष म्हात्रेला संजू सॅमसनसोबत सलामीला पाठवण्याची मागणी जोर धरत आहे. यावर भाष्य करताना अश्विन म्हणाला,
"बाहेर बसून चर्चा करणे सोपे असते. लोक आतापासूनच आयुष म्हात्रेला संधी देण्याबद्दल आणि ऋतुराजचा क्रम खाली करण्याबद्दल बोलू लागले आहेत. पण हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरेल. जर अशा कठीण प्रसंगी संघ व्यवस्थापनाने आपल्या कर्णधाराला विश्वास दिला नाही, तर त्याच्या आत्मविश्वासाचे काय होईल? सीएसकेने किमान आता तरी ऋतुराजला बदलण्याचा विचार करू नये. तो एक दर्जेदार खेळाडू असून लवकरच पुनरागमन करेल."
सलग तीन पराभवांनंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट राइडर्सला पराभूत करत चेन्नईने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. मात्र, अश्विनने ऋतुराजला त्याच्या फलंदाजीच्या शैलीत थोडा बदल करण्याचा सल्ला दिला आहे. ऋतुराज सध्या सुरुवातीलाच अति-आक्रमक फटके खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावत असल्याचे अश्विनचे निरीक्षण आहे. त्याने ऋतुराजला सुरुवातीला चेंडूचा टायमिंग साधण्यावर आणि जमिनीलगत फटके खेळण्यावर भर देण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने चेन्नईच्या या यशाचे श्रेय संजू सॅमसनला दिले आहे. स्टेनच्या मते, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संजूने ठोकलेल्या नाबाद ११५ धावांच्या शतकामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. या शतकाने संघात नवीन ऊर्जेचा संचार केला असून, त्यामुळेच संघ विजयाच्या मार्गावर परतल्याचे स्टेनने नमूद केले. आयपीएलसारख्या स्पर्धेत विजयाची लय सापडणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि संजूच्या खेळीने ते साध्य करून दिले आहे, असेही तो पुढे म्हणाला.