

MI vs CSK: IPL 2026 मध्ये झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला तब्बल 103 धावांनी पराभूत करत वानखेडे स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील 103 धावांच्या फरकाने झालेला हा सर्वात मोठा पराभव ठरला, तर चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सर्वात मोठा विजय ठरला.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 207 धावांचा मोठा डोंगर उभा केला. वानखेडेच्या फलंदाजांसाठी हे लक्ष्य अशक्य नव्हते. मात्र मुंबईची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संपूर्ण संघ केवळ 104 धावांत गारद झाला. या पराभवामागील मुंबई इंडियन्सच्या तीन मोठ्या चुका स्पष्टपणे दिसून आल्या.
पहिलं कारण म्हणजे गोलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी. जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या षटकांत विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या स्वतः गोलंदाजीला आला, पण त्यानेही जास्त धावा दिल्या. त्याने अवघ्या दोन षटकांत 38 धावा दिल्या.
दरम्यान, संजू सॅमसनने मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेत शतकी खेळी केली. त्याला रोखण्यासाठी मुंबईकडे कोणतीही ठोस रणनीती दिसली नाही. स्पिनर मिचेल सॅन्टनरलाही प्रभाव पाडता आला नाही. त्याने चार षटकांत 44 धावा दिल्या.
दुसरे मोठे कारण म्हणजे हार्दिक पंड्याचे नेतृत्व. महत्त्वाच्या क्षणी मुख्य गोलंदाजांऐवजी स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय संघाला महागात पडला. मागील सामन्यांमध्येही ही रणनीती फारशी यशस्वी ठरली नव्हती. फलंदाजीतही पंड्या पूर्णपणे अपयशी ठरला आणि फक्त एक धाव करून बाद झाला.
तिसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे मुंबईची ढासळलेली फलंदाजी. अवघ्या 11 धावांत मुंबईने तीन विकेट गमावल्या. दानिश मालेवर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. क्विंटन डी कॉक आणि नमन धीरही लवकर बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा यांनी 73 धावांची भागीदारी करत सामना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी तुटताच मुंबईचा डाव कोसळला.
84 धावांवर चौथी विकेट गेल्यानंतर अवघ्या 20 धावांत मुंबईने उर्वरित 7 विकेट गमावल्या. हार्दिक पंड्या, शेरफेन रुदरफोर्ड आणि शार्दुल ठाकूर यांच्यासारखे खेळाडूही अपयशी ठरले.
चेन्नईच्या विजयात अकील होसेन याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार षटकांत केवळ 17 धावा देत चार विकेट घेतल्या.नूर अहमद यानेही दोन विकेट घेतल्या. विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियममध्ये प्रथमच एका सामन्यात फिरकी गोलंदाजांनी तब्बल 9 विकेट घेत इतिहास घडवला.