MI vs CSK | चेन्नईविरुद्ध मुंबईचा फडशा!

मुंबईला 100 हून अधिक धावांनी नमविणारा चेन्नई पहिलाच संघ
MI vs CSK |
MI vs CSK | चेन्नईविरुद्ध मुंबईचा फडशा!
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : सॅमसनचा (54 चेंडूंत नाबाद 101) शतकी तडाखा आणि अकिल होसेनच्या (4/17) भेदक गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबई इंडियन्स संघाचा गुरुवारी 103 धावांनी अक्षरश: एकतर्फी धुव्वा उडवला. प्रारंभी, सॅमसनने धमाकेदार शतक साजरे केल्यानंतर चेन्नईने 20 षटकांत 6 बाद 207 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात मुंबईला विजयापासून कित्येक कोस दूरच राहावे लागले. मुंबईचा डाव 19 षटकांत 104 धावांमध्येच संपुष्टात आला.

विजयासाठी 208 धावांचे आव्हान असताना मुंबईच्या एकाही फलंदाजाला अगदी 40 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. तिलक वर्माने सर्वाधिक 37 तर सूर्यकुमारने 35 धावांचे योगदान दिले. क्विंटन डी कॉक (7), दानेश मालेवार (0) व नमन धीर (0) हे आघाडीचे तिघेही फलंदाज आल्या पावलीच परतल्यानंतर मुंबईच्या पडझडीला सुरुवात झाली. कर्णधार हार्दिक पंड्या (1), रुदरफोर्ड (0), शार्दूल ठाकूर (6) यांनीही तोच कित्ता गिरवला आणि शेवटपर्यंत पडझड अशीच कायम राहिली. चेन्नईच्या अकिल होसेनने 17 धावांत 4 फलंदाज गारद करत मुंबईला सातत्याने धक्के दिले. प्रारंभी, सॅमसनच्या 54 चेंडूंतील नाबाद 101 धावांच्या जोरावर चेन्नईने मुंबई इंडियन्ससमोर 207 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते.

चेन्नईचा सर्वात मोठा विजय

आयपीएल इतिहासात धावांच्या निकषावर चेन्नई सुपर किंग्जचा हा मुंबई इंडियन्सविरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला. बुमराहने यष्टीमागे सॅमसनकडे सोपा झेल देताच चेन्नईच्या या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब झाले.

सॅमसनला रोखण्यात अपयश

एका बाजूने ऋतुराज गायकवाड (22), सर्फराज (14) आणि दुबे (5) स्वस्तात बाद होत असताना गझनफर, अश्वनी कुमार, बुमराहने किफायतशीर गोलंदाजी केली. मात्र, त्यांना सॅमसनचा झंझावात रोखता आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news