

Tech Layoffs 2026: मेटा आणि मायक्रोसॉफ्ट या जगातील दोन मोठ्या टेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे मोठे निर्णय घेतले आहेत. एका बाजूला मेटा तब्बल 8 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे, तर दुसऱ्या बाजूला मायक्रोसॉफ्टने हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिला आहे. अहवालानुसार, या निर्णयांचा परिणाम अंदाजे 23,000 नोकऱ्यांवर होऊ शकतो.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मेटा कंपनी सुमारे 8 हजार नोकऱ्या कमी करणार असून जवळपास 6 हजार पदे रिक्तच ठेवणार आहे. कंपनीने हा निर्णय “कार्यक्षमता वाढवण्यासाठी” आणि व्यवसायातील नव्या गुंतवणुकीसाठी घेतल्याचे सांगितले आहे.
मेटाने कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक कपात होणार याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र अनेक रिपोर्टनुसार, कंपनी व्यवस्थापनातील कर्मचारी कमी करून तांत्रिक आणि इंजिनिअरिंग टीमवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीकडून प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी सेवरन्स पॅकेज किंवा अंतर्गत सूचनांची सविस्तर माहितीही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, मेटा सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना आधीच इशारा दिला आहे की 2026 मध्ये कंपनीचा खर्च 162 अब्ज डॉलर ते 169 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो. यामध्ये AI इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी आणि जास्त पगारावर AI तज्ज्ञांची भरती केली जाणार आहे.
दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतील सुमारे 8,750 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Buyout) घेण्याची ऑफर दिली आहे. कंपनीने सांगितले की, बदलत्या मार्केटमध्ये कंपनीची वाढ करण्यासाठी संघटनात्मक बदल आवश्यक आहेत.
टेक क्षेत्रातील विश्लेषक डॅन आयव्ह्स यांच्या मते, कंपन्या आता AI चा वापर करून अनेक कामे ऑटोमेट करत आहेत. त्यामुळे पूर्वी मोठ्या टीम्सना लागणारी कामे आता कमी मनुष्यबळात पूर्ण होऊ शकतात. यामुळे कंपन्या खर्च कमी करत अधिक कार्यक्षम आणि ‘लीन’ स्ट्रक्चरकडे वळत आहेत. AI च्या वाढत्या वापरामुळे टेक उद्योगात मोठे बदल होत असून, पुढील काळात अशा प्रकारच्या घटना आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.