Samson century IPL : वानखेडेवर संजू सॅमसनचे वादळ! मुंबई इंडियन्सविरुद्ध ठोकले शानदार शतक

MI vs CSK : मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेताना संजू सॅमसनने अवघ्या ५४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.
Samson century IPL : वानखेडेवर संजू सॅमसनचे वादळ! मुंबई इंडियन्सविरुद्ध ठोकले शानदार शतक
Published on
Updated on

मुंबई : आयपीएल २०२६ च्या ३३ व्या सामन्यात गुरुवारी (दि. २३) वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार फलंदाज संजू सॅमसनने बॅटने जबरदस्त धमाका केला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात संजूने या हंगामातील आपले दुसरे आणि आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. संजूच्या या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावांचा डोंगर उभा केला आहे.

५४ चेंडूत शतकी पराक्रम

मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेताना संजू सॅमसनने अवघ्या ५४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्सचा भाग झाल्यानंतरचे हे त्याचे दुसरे शतक आहे. यापूर्वी ११ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने पहिले शतक साजरे केले होते. टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या संजूला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, मात्र आता त्याने पुन्हा एकदा आपला आक्रमक फॉर्म परत मिळवला आहे.

केएल राहुलच्या विक्रमाशी बरोबरी

या शतकासह संजू सॅमसनने आयपीएलमधील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत केएल राहुलची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता प्रत्येकी ५ शतके आहेत. संजूने राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना २, दिल्ली कॅपिटल्ससाठी १ आणि आता चेन्नईसाठी २ शतके झळकावली आहेत. तसेच, चेन्नई सुपर किंग्ससाठी एकाच हंगामात दोन किंवा त्यापेक्षा जास्त शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत तो आता शेन वॉटसन, मुरली विजय आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासोबत सामील झाला आहे.

गेल्या वर्षी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेड डीलद्वारे संजू सॅमसन १८ कोटी रुपयांच्या विक्रमी किमतीत चेन्नई सुपर किंग्समध्ये दाखल झाला होता. दुसरीकडे, चेन्नईचा दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजा पुन्हा आपल्या जुन्या संघात म्हणजेच राजस्थान रॉयल्समध्ये परतला. केरळच्या या यष्टिरक्षक फलंदाजाने २०१३ मध्ये आयपीएल पदार्पण केल्यापासून बहुतांश काळ राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु २०२६ चा हा हंगाम त्याच्यासाठी आणि चेन्नईसाठी अत्यंत फलदायी ठरत असल्याचे दिसत आहे.

रोहित आणि धोनी मैदानाबाहेर

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. दुखापतीमुळे रोहित शर्मा सलग तिसऱ्या सामन्यात मुकला आहे, तर चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील दुखापतीमुळे अद्याप या हंगामातील आपला पहिला सामना खेळू शकलेला नाही. या दिग्गजांच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे पुरेपूर मनोरंजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news