

मागील २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारतीय नेमबाजांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
Manu Bhaker Asian Games 10m air pistol : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज (दि. २३ सप्टेंबर) महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरला पदकाने हुलकावणी दिली. पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवून अंतिम फेरीत धडक मारल्यानंतरही, तिला पदकापासून वंचित राहावे लागले.
पात्रता फेरीत ५७९-२०x गुण मिळवणाऱ्या भाकरने अंतिम फेरीत १८१.१ गुणांची नोंद केली. पदकासाठी चार नेमबाज शर्यतीत असताना, अंतिम फेरीच्या चौथ्या टप्प्यानंतर ती स्पर्धेतून बाहेर पडली. दक्षिण कोरियाच्या चू गा-उन (Choo Gaeun) हिने २४६.३ गुणांसह (आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रम) सुवर्णपदक जिंकले. चीनच्या शेन यियाओने २४१.३ गुणांसह रौप्यपदक, तर तिच्याच देशाच्या जियांग रॅनक्सिनने २२१.६ गुणांसह कांस्यपदक पटकावले. चायनीज तैपेईच्या चेंग येन-चिंगने २००.७ गुणांसह चौथा क्रमांक मिळवला.
भाकरने अंतिम फेरीची सुरुवात दमदार केली होती; तिने पहिल्या मालिकेत ५०.८ गुण नोंदवले आणि पहिल्या दोन मालिकांनंतर तिची धावसंख्या १००.३ वर पोहोचली होती. एलिमिनेशन फेऱ्यांच्या पहिल्या टप्प्यानंतर तिचे गुण १२०.४ होते आणि त्यानंतरच्या टप्प्यांमध्येही ती पदकाच्या शर्यतीत कायम होती. तिचे गुण १४०.७, १६०.७ आणि शेवटी १८१.१ असे वाढत गेले, परंतु निर्णायक टप्प्यांवर तिला आघाडीच्या गटासोबत टिकून राहता आले नाही. भाकरच्या सहकारी ईशा सिंग आणि सुरुची इंदर सिंग यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. ईशा ५७२-१२ गुणांसह १५ व्या, तर सुरुची ५६८-१२ गुणांसह २६ व्या स्थानावर राहिली.
याआधी सांघिक प्रकारातही भारताचे पदक थोडक्यात हुकले होते. भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. भाकर, ईशा सिंग आणि सुरुची या भारतीय त्रिकुटाने १७१९-४४x अशी एकूण गुणसंख्या नोंदवली. कांस्यपदक जिंकणाऱ्या व्हिएतनामची गुणसंख्याही इतकीच होती, परंतु भारताच्या ४४ च्या तुलनेत व्हिएतनामच्या खात्यात ४६ 'इनर-टेन्स' होते. चीनने १७३५-५६x गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर दक्षिण कोरियाने १७३०-५५x गुणांसह रौप्यपदक जिंकले.
२०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत, महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताची कामगिरी अधिकच प्रभावी होती. त्यात पलक गुलियाने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले, तर ईशाने रौप्यपदक मिळवले होते. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारातही भारताने रौप्यपदक जिंकले होते. त्यावेळी भारतीय संघात मनू भाकरचा समावेश नव्हता.