

IND W vs SL W Asian Games 2026 Gold Medal Match : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे. टीम इंडियाने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १५.४ षटकांत ६९ धावांत सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाने १४७ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील संघाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाचे खाते उघडले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २१७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २१६ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावले, तर रिचा घोष आणि शफाली वर्मा यांनी प्रभावी फलंदाजी केली. मानधना आणि शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करत भारताला भक्कम सुरुवात करून दिली.
मानधनाने ३० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शफालीचे अर्धशतक हुकले आणि ती ४८ धावांवर बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर १९ धावांवर बाद झाल्याने भारताला दुसरा धक्का बसला. मानधनाने आपली खेळी सुरू ठेवली, पण अखेरीस ती ४५ चेंडूंत ७९ धावा करून बाद झाली; तिने या खेळीत पाच चौकार आणि सात षटकार लगावले. त्यानंतर रिचा घोषने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली. रिचा आणि भारती फुलमाली यांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रिचा २२ चेंडूंत ४९ धावांवर (सहा चौकार आणि तीन षटकारांसह) नाबाद राहिली, तर भारती ७ धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून सुगंधिका कुमारी, कविशा दिलहारी आणि चामुडी प्रबोधा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताने दिलेल्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली. १८ धावांवर शफाली वर्माने इमिशा दुलानीला बाद करून पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर शफाली वर्माने हसिनी परेरा बाद केले आहे; हसिनीला खातेही उघडता आले नाही (ती 'डक'वर बाद झाली). ३० धावांवर श्रीलंकेने दोन गडी गमावले.
दोन झटपट गडी गमावल्यानंतर श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथ्थूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दीप्ती शर्माने तिला २९ धावांवर बाद करत श्रीलंका संघाला मोठा धक्का दिला. तिने २१ चेंडूचा सामना करत पाच चौकारांसह २९ धावा केल्या.
श्रेयंका पाटीलने हर्षिता समरविक्रमाला बाद करून श्रीलंकेला चौथा धक्का दि. ४४ धावांच्या धावसंख्येवर श्रीलंकेने चार विकेट्स गमावल्या. यादीप्ती शर्माने भारतीय महिला संघासाठी सहावी विकेट घेतली आहे. तिने कविशा दिलहारीला बाद केले; कविशाने १३ चेंडूंत ११ धावा केल्या होत्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. श्रीलंकेने ४९ धावांत सहा विकेट्स गमावल्या. भारतीय संघाचा विजय दृष्टीक्षेपात आला.
श्री चरणीने काव्या कविंडीला बाद करून श्रीलंकेला सातवा धक्का दिला. काव्या दोन धावांवर बाद झाली. यानंतर भारतीय संघाने तीन विकेटची औपचारिकता पूर्ण केली. श्रीलंकेचा संघ अवघ्या १५.४ षटकांमध्ये ६९ धावांत गारद झाला. भारताने हा सामना १४७ धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावले.
२०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळीही अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. यंदा जपानमधील आयची-नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकविण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे.